केंद्र, राज्य सरकार आणि सिंधुदुर्गातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय व्यासपीठाला कलाकारांचे व्यासपीठ बनविले आहे. फक्त घोषणा आणि डायलॉगबाजीव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. त्यामुळे या सरकारने लोकांची सहानुभूती गमावली असल्याची टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली.
सावंतवाडी काँग्रेस सुंदरवाडी पर्यटन महोत्सव शुभारंभप्रसंगी आमदार राणे बोलत होते. या वेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संजू परब, सभापती प्रमोद सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.
मेक इन इंडियाच्या नावाखाली जनतेला फसवत आहेत. या गुंतवणुकीसाठी करार करण्यात आले आहेत, म्हणजे गुंतवणूक आली असे म्हणता येणार नाही, असे आमदार राणे म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. कलाकारांच्या व्यासपीठाप्रमाणेच राजकीय व्यासपीठाचा वापर करून विकासाच्या नावाने डायलॉगबाजी सुरू आहे असे आ. राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व जिल्हा प्रशासन यांचा समाचारदेखील आ. राणे यांनी घेतला. विकासासाठी ९०० कोटी, ६०० कोटी आणण्याचे पालकमंत्री सांगत आहेत, पण नियोजन मंडळ, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण ही सारी धुळफेक असल्याचे उघड झाल्याने पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चादेखील नेला असे आ. राणे म्हणाले.
या वेळी माजी खासदार नीलेश राणे यांनीदेखील खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.
पालकमंत्र्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचे जनतेच्या लक्षात येत आहे. नाकावर चष्मा ठेवला म्हणजे कोणी गांधीजी होत नाही असा टोलादेखील केसरकर यांना लगावला.
शेतकरी, महिला, विद्यार्थी असे सर्वच वर्गातील लोक केंद्र व राज्य सरकारविरोधात गेले आहे. त्यामुळे या सरकारनी जनतेचा विश्वासघात केल्याने पुढील तीन वर्षांत सरकारे ढेपाळतील असे नीलेश राणे म्हणाले.
या वेळी सतीश सावंत, संजू परब यांनी विचार मांडले. झी २४ तासचे वृत्त निवेदक ऋषी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मान्यवरांचे सत्कारदेखील करण्यात आले.
चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम व कुशल बद्रिके यांनी विनोदाची धमाल उडविली तर अभिनेत्री सुकन्या काळण, तेजा देवकर, कोमल चंडेल व इतरांनी मनोरंजन केले.