महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे संकेत नितेश राणे यांनी दिले आहेत. नितेश राणे कणकवलीचे आमदार असून ते नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा घडवून आणणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे.

नारायण राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेस नेत्यांनीच दिल्लीपासून गल्लीपर्यंत नारायण राणे भाजपामध्ये चालले अशी बोंब केली. आता काँग्रेस नेतेच नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार अशी बोंब करतात. आमची दिशा ठरली आहे असे सूचक टि्वट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी नारायण राणेंना काँग्रेस पक्षात घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे सावंतवाडी येथे सांगितले. त्यानंतर नितेश राणे यांनी हे टि्वट करुन काँग्रेस नेतेच नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशांची बोंब करतात असे टि्वट केले.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये परतू शकतात असे विधान केले होते. त्यानंतर नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली. नारायण राणे यांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे अफवा आहे. नारायण राणेंना काँग्रेस पक्षात घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांना भाजपामध्ये प्रवेश करुन मंत्रिपद मिळवायचे होते. पण ते शक्य नसल्यामुळे त्यांनी १ ऑक्टोंबर २०१७ रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली व भाजपाला पाठिंबा दिला. त्यानंतर ते भाजपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर खासदार झाले. नारायण राणे यांचा भाजपाच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकींचा जाहीरनामा बनवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वीस सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून या जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून एकमेव नारायण राणे यांचा समावेश आहे.