केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे राजकारणविरहित मैत्रीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्या  शनिदेवाच्या दर्शनासाठी आयोजित केलेल्या दौऱ्याला राजकीय साडेसातीची बाधा झाली.

गडकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांपासून ते दिलीप वळसेंपर्यंत आणि काँग्रेस, शिवसेनेसह  सर्वच पक्षांत त्यांचे मित्र आहेत.  नगर जिल्ह्य़ातही अनेक नेत्यांशी त्यांचे मत्रीपूर्ण संबंध आहे. माजी खासदार साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्याशीही त्यांची अशीच मैत्री असून  यापूर्वी शनिदेवाच्या दर्शनासाठी आले असता दोनतीन वेळेस गडाखांच्या  निवासस्थानी गेले. विधानपरिषदेत दोघेही एकत्र काम करत असताना त्यांच्यात मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यामुळेच गडकरी शनिदर्शनासाठी येणार असल्याने सोनईला गडाखांचा पाहुणचार घेणार हे गृहीत होते. मात्र, याला राजकीय साडेसातीची बाधा झाली.

गडाख यांचे चिरंजीव माजी आमदार शंकरराव यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून राजकारण सुरू केले असून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे गडाख यांचे विरोधक आहेत. रविवार दि. २९ रोजी गडकरी दौऱ्यावर येत असून सोनईला गडाख यांच्या घरी जात आहे, हे त्यांना सहन झाले नाही. राजकारणात त्याचा चुकीचा संदेश जाईल, अशी तक्रार त्यांनी पक्षाकडे केली. त्यामुळे गडकरी दौऱ्यात बदल झाला. गडकरी  यांचे हेलिकॉप्टर सकाळी ९ ला सोनई येथील मुळापब्लिक स्कूलजवळ असलेल्या मुळा शिक्षण संस्थेच्या मदानावर उतरणार होते. तेथून मोटारीने शनिदेवाचे दर्शन घेऊन १० वाजता पुन्हा सोनईला येणार होते. अर्धा तास हेलिपॅडवर राखीव होता. तेथून ते  गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन शिर्डीला रवाना होणार होते. त्यांच्या दौऱ्यात संपर्कासाठी शनिदेवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले व प्रशांत गडाख यांचे दूरध्वनी देण्यात आले होते. पण हा दौरा आमदार मुरकुटे यांना खटकला. आपला नामोल्लेख नसल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी थेट पक्षाकडेच तक्रार केली. त्यामुळे अखेर दौऱ्यात बदल करुन हेलिपॅडची जागा बदलण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शंकर गडाख हे विरोधात निवडणूक लढविणार असल्याने मतदार संघात चुकीचा संदेश जाईल. मतदारांमध्ये संभ्रम होईल म्हणून गडकरी यांनी सोनईला जाऊ नये असे साकडे घातले. त्यामुळे दौऱ्यात बदल करण्यात आला.  मुरकुटे यांच्या आक्षेपामुळे आता सोनईऐवजी घोडेगाव येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. ते मुंबईहून सकाळी ८ वाजता निघतील. त्यांचे हेलिकॉप्टर घोडेगाव येथे ९ वाजता येईल. त्यानंतर शनिदेवाचे दर्शन घेऊन ते १० वाजता मोटारीने पुन्हा घोडेगावला जातील. तेथे अर्धा तास राखीव ठेवला आहे. तेथून ते शिर्डीला रवाना होतील. दौऱ्याच्या दुसऱ्या कार्यक्रमात केवळ हेलिपॅडची जागा बदलली आहे. मात्र या दौऱ्यातही दरंदले व गडाख यांचाच संदर्भ आहे. मुरकुटे यांना दुर्लक्षित केले आहे.

आमदार मुरकुटे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, गडकरी हे शनिदेवाच्या दर्शनासाठी शनीशिंगणापूरला येणार आहेत. गडाख यांच्या निवासस्थानी ते जाणार असल्याचा कुठलाही उल्लेख दौऱ्यात नव्हता. पण राजकारणासाठी ध चा मा केला जातो. देवस्थानकडून दरंदले, गडाख यांची नावे कळविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही. देवस्थानमुळे गडाखांचे नाव आले. गडकरी यांनी विकासाकरिता नेवासे मतदार संघाला मोठा निधी दिला असून त्यांचे स्वागत करणार आहोत. दौऱ्यापासून बेदखल करण्यात आले नाही, असाही त्यांचा खुलासा होता.

मत्रीमुळे निमंत्रण दिले होते

गडकरी सोनईला येणार असल्याने निमंत्रण देण्यात आले. व्यक्तिगत संबंधांच्या आड राजकारण येता कामा नये, आम्ही देखील तसे केले नाही, करीत नाही. खरेतर मुरकुटे यांनीही अशी भूमिका घ्यायला नको होती. राजकारणात पक्षापलिकडे संबंध असू शकतात. खरेतर हा वादाचा विषय नको. गडकरी यांची अडचण होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे प्रशांत गडाख यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

गडकरींचा अराजकीय दौरा

रविवारचा  गडकरी यांचा दौरा हा अराजकीय आहे. ते शनिशिंगणापूरला शनिदेवाचे तर शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेणार आहे. तेथून ते मलकापूर (ता. संगमनेर) येथे उद्योगपती रवींद्र बिरोले यांनी उभारलेल्या युटेक शुगर या खासगी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामास उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा कुठलाही कार्यक्रम नाही. पूर्णपणे खासगी स्वरूपाचा हा दौरा आहे. पण त्यालाही राजकारणाची बाधा झालीच.