विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावामुळे राज्यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील अंतर आणखी वाढणार आहे.
शिवाजीराव देशमुख हे कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू नये, यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीसुद्धा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्याला यश आले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारीच देशमुख यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २८ सदस्य आहेत. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४० सदस्यांची गरज आहे. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने भाजपचे सदस्य मतदान करणार का, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.