महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजप-शिवसेनेत स्पर्धा सुरू असताना आज येथे आयोजित एका मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणास मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले.
माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने लोहा येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ठाकरे यांनी ही घोषणा केली. ठाकरे यांच्या भाषणापूर्वी सेनेचे उपनेते अमोल कोल्हे व सचिव आदेश बांदेकर यांनी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हटले होते. तो धागा पकडून ठाकरे यांनी आपणास मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, की आघाडीचे दिवस आता भरले आहेत. हे सरकार खोटय़ा जाहिराती करून जनतेची फसवणूक करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला राज्यातील जनता पुरती वैतागली आहे. शिवशाही व आताच्या काळातील कामांची तुलना झाली पाहिजे, असे सांगतानाच हे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनापासून काँग्रेस-राष्ट्रवादी ‘चले जाव’चे जनआंदोलन सुरू करीत आहोत.
लोहा मतदारसंघासह राज्यात भगवा फडकणार आहे, असा विश्वास व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, की राज्यात सत्ता आल्यावर बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘टॅब’ देणार आहोत. ममता दिनानिमित्त मुद्दाम या मतदारसंघात आलो आहे. राज्यातील ‘आघाडी सरकार चलेजाव’ची चळवळ येथून सुरू करीत आहोत. येत्या काळात आणखी काय करणार ते पाहा ,असे जाहीर करताना परिवर्तनाच्या लढय़ास सज्ज राहा, अशी सादही ठाकरे यांनी घातली.
चिखलीकरांनी भाषणात विस्ताराने भूमिका मांडली. खासदार चंद्रकांत खैरे, संजय जाधव व रवींद्र गायकवाड, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धोंडूतात्या पाटील (लातूर) व आनंदराव जाधव (हिंगोली), आमदार मीरा रेंगे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, माजी आमदार अनुराधा खेडकर, सुभाष साबणे, आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर आदी उपस्थित होते.
‘पवारांना आता कसं वाटतं?’
शरद पवार यांनी आमचा पक्ष फोडला. आता त्यांचा पक्ष फुटत आहे. एकेक चांगले नेते आमच्याकडे येत आहेत. आता तुम्हाला कसं वाटतं? दुसऱ्यांचा पक्ष फोडताना चांगलं वाटतं. राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला.