News Flash

ऑगस्ट महिन्यात पावसाची दडी!

८० टक्के लघुप्रकल्पांत केवळ ४२ टक्के पाणीसाठा

८० टक्के लघुप्रकल्पांत केवळ ४२ टक्के पाणीसाठा

ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त पाऊस होतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे. परंतु यावर्षी ऑगस्ट महिन्यात गेल्या १८ दिवसांत केवळ ५२.२ मि.मी. पावसाची नोंद झाली तर काही तालुक्यांमधून पाऊस गायब झाला आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे पिकांची अवस्था चांगली असली तरी जिल्ह्यातील ९ पकी पाच मध्यम प्रकल्पात अल्पसा साठा आहे तर ८० लघु मध्यम प्रकल्पात केवळ ४२ टक्के पाणीसाठा आहे.

यावर्षी सरासरीएवढा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. जूनमध्ये लागलेल्या मृग नक्षत्राच्या प्रारंभीच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दोन आठवडय़ापासून म्हणजे १९ जूनपासून सलग सहा आठवडय़ात सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला. यामुळे माहूर, हिमायतनगर, भोकर व लोहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. एकाच दिवशी हिमायतनगर तालुक्यात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या.

त्यानंतर रिमझिम पाऊस सुरूच राहिल्याने पिकांसाठी पोषक असे वातावरण निर्माण होऊन पिकांची वाढही दमदार झाली. याच दरम्यान काही ठिकाणी अतिपाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी नदीलगतची जमीन खरडली गेल्याने त्यात अधिक भर पडली. जिल्हाभरात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे परिणामही दिसू लागले. खोल व रुंद केलेले नाले, समतल चर, नाला बांध आदी कामांमुळे जलसाठा वाढण्यास मदत झाली. वाढत्या पाणीसाठय़ामुळे शेतकऱ्यांतही  समाधानाचे वातावरण दिसू लागले ते जुलअखेपर्यंत कायम राहिले.

ऑगस्ट महिन्यात मोठय़ा प्रमाणात पावसाची झड असते. श्रावणसरींचा महिना म्हणून त्याची ओळख आहे. परंतु यंदा मात्र चित्र वेगळे असून जुलअखेपर्यंत कायम राहिलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र विश्रांती घेतली आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या नोंदीनुसार सरासरी १९.३९ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी १४.७१, ४ ऑगस्ट रोजी ६.१ मि.मी. पाऊस झाला.

१४ ऑगस्ट रोजी ३.३७ मि.मी. पावसाची नोंद झाली, परंतु अन्य दिवसांत मात्र पाऊस नगण्यच होता. पावसाळ्याचा सव्वा महिना बाकी असताना पाऊस सरासरी गाठेल काय, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांपकी विष्णुपुरी ८७ टक्के भरले आहे. तर मानार धरणात केवळ १६ टक्के पाणी साठा आहे तर िलबोटीमध्ये ३९ टक्के पाणीसाठय़ाची नोंद आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरण ७० टक्क्यांपेक्षाही अधिक भरले असले तरी नांदेड जिल्ह्यासाठी इसापूर धरणातील पाणीसाठा वाढणे गरजेचे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:24 am

Web Title: no rainfall in august
Next Stories
1 खडसे यांचा शनिशिंगणापूर दौरा
2 कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न, फौजदार निलंबित, अद्याप गुन्हा नाही
3 शिक्षकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य
Just Now!
X