17 December 2017

News Flash

मराठीच्या ‘अभिजातपणा’चा अहवाल तयार

मराठी भाषेचे वय किती, हे शोधत तिच्या अभिजातपणाचे पुरावे देणारा अहवाल २३ जानेवारी रोजी

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद | Updated: January 21, 2013 3:42 AM

मराठी भाषेचे वय किती, हे शोधत तिच्या अभिजातपणाचे पुरावे देणारा अहवाल २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. मराठी भाषा पक्व होण्यापूर्वी तिच्या जडणघडणीतील मराठीच्या अस्तित्वाचे भक्कम पुरावे अभिजात मराठी अभ्यास समितीने मिळविले आहेत. विशेष म्हणजे मराठी प्रेमाचे गळे काढत साहित्यिक वाद जेव्हा चिपळूनमध्ये टीपेवर होता, तेव्हा डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या अहवालावर अंतिम हात फिरविण्यात मग्न होती.
अभिजात मराठी समितीचे सदस्य आणि संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी मराठीच्या अभिजाततेविषयी केलेला ओझरता तोंडी उल्लेख वगळता या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वानीच मौन बाळगले. हा विषय वळचणीत ठेवण्याची जणू व्यवस्थाच संमेलनात होती. वर्षभर या विषयावर भाषणे लावायची, ती ऐकायची आणि साहित्य संमेलनात मात्र त्यावर काहीच भाष्य करायचे नाही, ही एक प्रकारे भाषेचीच प्रतारणा असल्याची टीका आता होऊ लागली आहे. दरम्यान या अहवालाचे इंग्रजीत भाषांतर केले जात असून ते पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
‘आदर्श’ प्रकरणातून अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावली जाईल, असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर ‘त्यांना मराठी तरी येते का’, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर भाषेच्या समृद्धीसाठी काम के ले जाईल, असे सांगत मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी एक बैठक घेतली होती. तेव्हा बहुतांश साहित्यिकांनी मराठी भाषेचे वय अभिजात दर्जा मिळण्या एवढे जुने नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर मराठी भाषेचे अस्तित्व इतिहासात शोधण्यासाठी डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकारने नेमली होती.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नेमलेल्या या समितीतील सदस्यांनी ८०० वर्षांपूर्वी पक्व झालेल्या मराठी भाषेचे ऐतिहासिक संदर्भ अभ्यासले. या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे म्हणतात, ‘मराठीच्या अस्तित्वाच्या खुणा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. पूर्वी या अनुषंगाने खूपच काम झाले आहे. आपल्याकडच्या ‘विद्वानांना’ ते माहीत नाही. शं. गो. तुळपुळे आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मोठे काम करून ठेवले आहे. तसेच अ‍ॅना फोल्ड यांनी मराठी शब्दकोश तयार केलेला आहे. मराठीच्या अस्तित्वाचे अनेक दाखले या अहवालात आहेत. अभ्यास म्हणून मराठीच्या प्रेमासाठी केलेले हे प्रयत्न निश्चितच कामी येतील.’
या मसुदा समितीत समन्वयक म्हणून काम करणारे हरी नरके म्हणाले की, ‘मराठी भाषेचा इतिहास आणि वापर याचे पुरावे असणारा दोनशे पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याच्या भाषांतराचे काम पूर्ण झाल्यानंतर तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. वर्षभरात काम पूर्ण झाल्यानंतर तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. वर्षभरात या कामासाठी अनेक संदर्भ अभ्यासता आले. मराठी भाषेचे वय किती, या प्रश्नाचे उत्तर यामुळे बदलले जाणार आहे.’
मराठी भाषेला केंद्राने अभिजात दर्जा दिला तर साधारणत: १०० कोटी रुपयांची मदत भाषा विकासाल मिळू शकते. हा अहवाल इंटरनेटच्या माध्यमातून सर्वासाठी खुला ठेवण्याच्या सूचनाही अभिजात मराठी समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी दिल्या आहेत.

First Published on January 21, 2013 3:42 am

Web Title: nobel marathi report ready