नव्या निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात शासनाचा निर्णय

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

नवी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा दहा वर्षांची सेवा होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास दहा लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली आहे. खासगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शंभर टक्के अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू आहे. या योजनेस राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करून योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच अशा कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्ती योजना कार्यान्वित होणार आहे.

या पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सानुग्रह अनुदान लागू करण्याचा विचार केला होता. दहा वर्षांची सेवा होण्यापूर्वीच शालेय शिक्षक किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान म्हणून दहा लाख रुपये अधिक कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम वारसदारास मिळणार आहे. काही प्रकरणात शिक्षक किंवा कर्मचारी यांचे खाते उघडण्याची जबाबदारी असणाऱ्या कार्यालयाने खाते उघडले नसेल तरी देखील ही रक्कम वारसदारास दिली जाणार आहे. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती आवश्यक आहे.