गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने नोटीस दिली आहे. मात्र त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. वादग्रस्त वक्तव्याचे पुन्हा जाहीर समर्थन सुरू केल्याने त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोमवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. गर्भलिंग चाचणीसंदर्भात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी त्यांना प्रसूतिपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल का करू नये, अशी नोटीस बजावली. या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सल्लागार समितीनेही नोटीस बजावली. अद्याप इंदुरीकर यांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही.  इंदुरीकर महाराज यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी पुणे येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे.

मला संपवण्याचे कारस्थान – इंदुरीकर

सध्याच्या युगात आजवर किती चांगले सांगितले याकडे दुर्लक्ष करत एखाद्या चुकीत पकडण्याकडे सर्वाचे लक्ष असते. माझ्याविरुद्ध यातूनच सर्वत्र टीका सुरू असून मला संपवण्याचे कारस्थान सुरू असल्याची टीका निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे बोलताना केली.

गर्भलिंग निदान कायद्यातील तरतुदीनुसार इंदुरीकर महाराज यांना नोटीस देण्यात आली आहे. बुधवार, दि. २० पर्यंत त्यांनी खुलासा केला पाहिजे. तो केला नाही तर त्यांना पुन्हा सात दिवसांत खुलासा करण्याची नोटीस देण्यात येईल. त्यांचे म्हणणे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर.

इंदुरीकर महाराज यांनी अशास्त्रीय वक्तव्य केले आहे. गर्भलिंग कायद्यातील तरतुदीचा त्यांनी भंग केला आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशा सामाजिक परिस्थितीत इंदुरीकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. नैतिकदृष्टय़ा हा गुन्हा आहे. वारकरी संप्रदायात असल्या भेदाभेदाला मान्यता नाही. वक्तव्य केल्यानंतरही ते कीर्तनातून समर्थन करत आहेत. त्यामुळे सोमवार, दि. १७ रोजी इंदुरीकर महाराजांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुन्हा दाखल करणार आहे.

– रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती.