ऊस दराचा प्रश्न अद्याप मिटलेला नसला तरी सांगली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना गाळपानंतर १४ दिवसांत पहिली उचल दिली नाही म्हणून फौजदारी का करू नये, अशा नोटिसा साखर सहसंचालकांनी बजावल्या आहेत. नोटिसा बजावण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये हुतात्मा, क्रांती, सोनहिरा, विश्वास आणि उदगीर या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
    ऊस उत्पादकांचा ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत पहिली उचल संबंधित गाळप करणाऱ्या साखर कारखान्याने उत्पादकांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. तसेच ही उचल केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान दराप्रमाणे असणे बंधनकारक आहे. असे असताना सांगली जिल्ह्यातील गाळप होऊनही उत्पादकांचा पहिला हप्ता जमा केलेला नाही.
    कारखान्यात गाळप होत असलेल्या उसाला साखर उताऱ्यानुसार टनाला २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत जातो. सध्या साखरेच्या दरात घसरण झाली असून या दरावर उत्पादित होणाऱ्या साखरेवर तारण ठेवून राज्य बँकेकडून कर्ज उपलब्ध होत असले तरी बाजारभावामुळे कमी पसे कारखान्यांना उपलब्ध होत आहेत.
    जिल्ह्यात क्रांती, हुतात्मा, सोनहिरा, उदगीर आणि विश्वास या साखर कारखान्यांनी गाळप हंगाम १५ आक्टोबरपूर्वी सुरू केले आहे. या कारखान्यानी पहिली उचल दिली आहे का, याची माहिती सहसंचालक यांनी मागिवली होती. त्यावेळी अद्याप पहिली उचल दिली नसल्याचे उघडकीस आल्याने या पाच साखर कारखान्यांना फौजदारी कारवाई का करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. समाधानकारक खुलासा आला नाही तर संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे.