राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज(बुधवार) राज्यातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल जनतेला माहिती दिली. सध्या किती जणांचे लसीकरण झाले आहे? किती जणांचे लसीकरण बाकी आहे? दिवसाकाठी किती लसीकरण करणा आहोत? त्यासाठी राज्याला काय आवश्यक आहे, इत्यादी अनेक प्रश्नांबाबत त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हणाले, “आज करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण १८८० सेंटर महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत आपण ३३ लाख ६५ हजार ९५२ एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. या लसीकरणाचा समाजातील घटकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी, ६० पेक्षा अधिक वय असणारे व्यक्ती व ४५ पेक्षा जास्त वय असलेले कोमॉर्बिड लोकांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये आपण जर आज बघितलं तर २ लाख ३२ हजार ३४० एवढं कालचं लसीकरण झालेलं आहे. आपण आता तीन लाखाच्या गतीने लसीकरण करायचं असा निर्धार आपण केलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला अशा स्वरूपात लसीकरण करायचं असेल, तर आपल्याल लसीकरणाची गती जी आपण वाढवलेली आहे, त्यासाठी लागणारी लस देखील तेवढ्याच गतीनं प्राप्त होणं गरजेचं आहे.”

Coronavirus – …आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता – मोदी

तसेच, “साधरणपणे , २ कोटी २० लाख डोस आपल्याला आगामी तीन महिन्यांमध्ये आवश्यक आहे. कारण हे उद्दिष्ट आपल्याला तीन महिन्यात पूर्ण करायचं आहे. त्यासाठी साधारण दर आठवड्याला आपल्याला २० लाख डोस आवश्यक आहेत. म्हणून या २० लाख डोससाठी मागणी आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे आपण केलेली आहे. आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांना देखील याबाबत पत्र दिलेलं आहे. तीन लाखाच्या दररोजच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार फक्त दहा दिवसांचा स्टॉक उपलब्ध असल्याची माहिती, आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांना सांगण्यात आलेलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेत हे त्यांच्या कानावर घातलेलं आहे.” अशी देखील यावेळी राजेश टोपे यांनी माहिती दिली.