महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण वाढणार आहे अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

आतापर्यंत ४,२२८ जणांची Covid-19 ची चाचणी करण्यात आली. त्यात ४,०१७ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर १३५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे राजेश टोपे यांनी सांगितले. जे १९ करोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ते उपचारानंतर पूर्णपणे  बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

पिंपरीत तीन रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.

दरम्यान राजेश टोपे यांनी संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहनही राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं आहे. अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयं भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल टोपे यांनी केला.

आम्ही सर्वांना सुचित केलं आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. करोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं टोपे म्हणाले.