नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ते पद जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार असे बोलले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नाना पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोलेंनी हा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली. सरकार स्थिरस्थावर होत असताना, नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

आज पुण्यात शरद पवारांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे” असे शरद पवार म्हणाले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरु झाली होती.

संजय राऊत या विषयावर म्हणाले…
कांग्रेसनं विधानसभेचं अध्यक्षपद असलेल्या नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं. “नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असं आम्ही सामनात म्हटलं आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.