सध्याचे सरकार हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे. या सरकारला कसे जागे करणार? काँग्रेस पक्षाला भविष्यात सरकारविरुद्ध आक्रमक संघर्ष करावा लागेल. संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला.
जिल्ह्य़ातील पोखर्णी येथे चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे आयोजक, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रामप्रसाद बोर्डीकर, कुंडलीक नागरे, माजी खासदार तुकाराम रेंगे, जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, पक्षनिरीक्षक टी. पी. मुंढे, हरिभाऊ शेळके, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, माजी  नगराध्यक्ष जयश्री खोबे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या केंद्र व राज्य सरकारांची भूमिका शेतकऱ्याला मदत करण्याची नाही. ग्रामीण जनतेला आपलेसे करणारे कोणतेच निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. या उलट मोठय़ा उद्योगपतींना मदत करणारे हे सरकार आहे, असा आरोप चव्हाण यांनी या वेळी केला. जिल्हा बँक चांगली चालावी. ज्यांच्यासाठी बँक आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये असे सांगून जिल्ह्याचे नेतृत्व भक्कम करण्याची जबाबदारी जनतेने पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारने कर्ज पुनर्गठन करण्याची भूमिका घेतली असली, तरी व्याजाचा भरुदड शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. अशा स्थितीत कर्जमाफी हाच एक उपाय आहे. काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
वरपुडकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. गेल्या १५ वर्षांत ४ वष्रे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. जे क्षेत्र सिंचन प्रकल्प लाभक्षेत्राखाली आहे त्यांना पिकांसाठी पाणी तर मिळत नाहीच; पण लाभक्षेत्रात असल्याची शिक्षा कराच्या रूपाने भरावी लागते. सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना याचा विचार करावा. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही बागायती शेतकऱ्यांप्रमाणेच नुकसानभरपाई मिळायला हवी. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचेही पुनर्गठन करण्यात यावे. पुनर्गठनाचे व्याज सरकारने भरावे आदी मागण्या त्यांनी केल्या.
नागरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना धमाल उडवून दिली. शेतकऱ्यांना एकरी दहा लाख रुपये देण्याची देशाची क्षमता आहे. मात्र, नियोजन नसल्याने तसे होत नाही. जिल्हा बँकेचा पूर्ण व्यवहार अजून आपल्या हाती आला नाही. एकरी एक लाख रुपयांचे कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. भविष्यात चव्हाण मुख्यमंत्री, तर बोर्डीकर मंत्री होतील, असेही नागरे म्हणाले. बोर्डीकर यांनीही या वेळी वरपुडकरांची प्रशंसा करीत वरपुडकरांच्या रूपाने नवी पलटण पक्षात दाखल झाली. त्यांची ताकद आता पक्षाला वेगळे चित्र प्राप्त करून देईल, असे सांगितले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच आपण सुरुवातीपासून काँग्रेसचे काम केले. भविष्यातही काँग्रेसमध्येच राहू. वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही, असे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बोर्डीकरांनी हा खुलासा केला. जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी जुन्या घरात सर्वाचे हार्दकि स्वागत म्हणत वरपुडकरांच्या काँग्रेसमधील प्रवेशाची नोंद घेतली. या वेळी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचीही भाषणे झाली. प्रा. सुनील तुरुकमाने यांनी सूत्रसंचालन केले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण प्रथमच परभणी जिल्हा दौऱ्यावर आले. सकाळी माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्या निवासस्थानी चहापाणी घेतल्यानंतर दिवंगत नेते शेषराव देशमुख व माजी उपमहापौर सज्जूलाला यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर परभणी जिल्हा बँकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ चव्हाण यांनी केला. बी. रघुनाथ सभागृहात पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या आढावा बठकीत कार्यकर्त्यांची कैफियत ऐकून घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, कार्यकर्त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विधानसभानिहाय संपर्कप्रमुख नियुक्त केले जातील, अशी ग्वाही दिली.