कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्य़ातील एका आरोपीला शुक्रवारी मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांनी मनोधैर्य योजनेतून ३ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.थरकाप उडवणाऱ्या या गुन्ह्य़ातील आरोपी संतोष गोरख भवाळ (वय ३०, राहणार कुळधरण, तालुका कर्जत) याला शुक्रवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक शिवाजीराव गवारे यांनी पथकासह छापा टाकून या अटक केली. या गुन्ह्य़ात पोलिसांनी जितेंद्र शिदे या आरोपीसपूर्वीच अटक केली होती. त्याला दि. २२ जुलैपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी अटक केलेला जितेंद्र शिंदे याची व त्याच्या कुटुंबांची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्याच्या भावाने गावातील धनराज सुद्रिक यांचा काही महिन्यापूर्वी खून केला होता मात्र हे प्रकरण दहषतीमुळे दडपण्यात आले होते. तसे मयताच्या पत्नीने शनिवारी येथे सांगितले. त्यावर जिल्हा पेालीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले. शिंदे याला तीन बायका असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
पालकमंक्षी राम शिंदे यांनी शनिवारी सकाळी कोपर्डी येथे पीडितांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या गुन्ह्य़ाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचे जाहीर केले.पीडित मुलगी व नागरिकांच्या भावनेशी सहमती दर्शवत आरोपींना कोणी पाठिशी घालणार नाही, असी ग्वाही त्यांनी दिली.