जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढीचा आलेख आज सोमवारीही चढता राहिला. जिल्ह्यात आज २० नवीन रूग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय करोनाबाधितांची संख्या दीडशेवर पोहचली. आज बाधित आढळलेल्या रूग्णांपैकी १० जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर १० जणांचा अहवाल ‘रॅपिड ॲन्टीजन टेस्ट’द्वारे पॉझिटिव्ह आला. वैद्यकीय महाविद्यालयातील तिघांना उपचारानंतर आज घरी पाठविण्यात आले.

सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये १३ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. यात दिग्रस शहरातील बारभाई मोहल्ला येथील एक महिला, काझीपुरा येथील सहा पुरूष व तीन महिला, वणी शहरातील तेली फैल येथील एक महिला, दोन पुरूष आणि पुसद येथील पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. आज सक्रिय करोनाबाधितांचा आकडा १५३ वर पोहचला होता. मात्र. तिघे जण बरे होऊन त्यांना घरी पाठवल्याने ही संख्या दीडशेवर आली आहे.

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४६२ वर पोहचली आहे. यांपैकी २९९ रूग्ण बरे होऊन स्वगृही परतले तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.