लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर-बोईसर मार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठय़ा क्षमतेची क्रेन रुतून पडल्याने या मार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद राहिली. चारचाकीने प्रवास करणाऱ्या हजारो कामगारांचा गुरुवारचा रोजगार यामुळे बुडाला. या वेळी या मार्गावरून दुचाकीस्वारांना मार्ग काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

विशेष रस्ता प्रकल्पांतर्गत सरावली येथे रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून सरावली प्रवेशद्वार ते स्मशानभूमी दरम्यानच्या रस्ते काँक्रिटीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. त्यापैकी एका बाजूला खडी टाकून त्याचे मजबुतीकरण करून एका मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. याच भागात ही घटना घडली.

याच वेळी दुचाकीस्वारांना या भागातून मार्ग काढण्यास मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागले. पालघरहून बोईसर गाठण्यासाठी उमरोळी- बिरवाडी-बेटेगाव या अरुंद पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. कामगारांसाठी रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा नसल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सकाळी या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने रिक्षा आणि बस सेवा पूर्णपणे ठप्प होती. सरावली येथील या वळणावरील रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूंच्या खोदकामात समतल करणे आवश्यक होते, असे रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले. रस्त्यात रुतलेली क्रेन दुपारनंतर बाहेर काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.