लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे आणखी एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९५ रुग्ण दगावले आहेत. २२ नव्या रुग्णांचीही नोंद सोमवारी झाली असून एकूण रुग्ण संख्या १९०१ झाली आहे. ३६ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. रुग्ण संख्यासोबतच मृत्यूदर वाढत असल्याने जिल्ह्यात धोकादायक परिस्थिती झाली. गत तीन दिवसांपासून पुन्हा मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ३१६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २९४ अहवाल नकारात्मक, तर २२ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पातूर येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णांचा शासकीय वैद्याकीय महाविद्याालयात मृत्यू झाला. त्यांना १ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी १५ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात महिला सात व आठ पुरुष आहेत. त्यामध्ये पातूर येथील तीन जण, नवीन बसस्थानक जवळ, गोरक्षण रोड, अकोट, मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन तर गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी प्राप्त अहवालात आणखी सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. हे सर्व सात जण मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. आज दिवसभरात सर्वोपचार रुग्णालयातून आठ, कोविड केअर सेंटर मधून १९, आयकॉन रुग्णालयातून पाच व खासगी हॉटेल येथून चार अशा ३६ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

अकोल्यातील ४.९४ टक्के रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गत तीन दिवसांपासून पुन्हा मृत्यूच्या घटना समोर आल्या. त्यामुळे मृत्यूदर ४.९४ टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.