लोकसत्ता वार्ताहर
करोनामुक्त असलेल्या पंढरपूर तालुक्यात मुंबईहून आलेल्या नागरीकामुळे करोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील उपरी या गावात ९ जण मुंबईहून आले. त्यातील एका रुग्णाची करोनाची चाचणी सकारात्मक आली.मात्र तातडीने प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरु केले आहेत.त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले असून अतिधोकादायक आणि धोकादायक लोकांची यादी करणे सुरु केले आहे. केंद्र, राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार येत्या १२ दिवसात तालुका करोनामुक्त करु असा विश्वास प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केला.

पंढरपूर तालुका करोनामुक्त होता.येथील प्रशासनाने विविध उपाय योजना करून करोनाला रोखले होते. मात्र आप-आपल्या गावी परत जाण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे रेड झोन क्षेत्रात अडकलेले नागरिक गावी परतू लागले. यात पंढरपूर तालुक्यात देखील अनेकजणांची घरवापसी झाली.तालुक्यातील उपरी या गावात नऊ जण मुंबईहून आले. या सर्वांना शाळेत ठेवण्यात आले. यातील एकाची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्या रुग्णाची करोना चाचणी केली. याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. करोनाचा शिरकाव तालुक्यात झाला.

याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलती उपरी गाव हे प्रतिबंधात्मक क्षेत्र केले.तातडीने उपरी गावात निर्जंतुकीकरण केले. तसेच त्या रूग्णाबरोबर शाळेत राहिलेले ८ जण आणि त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले असे एकूण ३२ जणांना संस्थात्मक विलगीकरण कशात ठेवले आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांचे पथक आता अति-धोकादायक आणि धोकादायक व्यक्तींची यादी करीत आहे.ग्रामीण भागात पोलिसांनी २४ तास गस्त ठेवली आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांनी या पृवी सतर्कता दाखावली होती आता पुढील १२ दिवसात संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सांगोला आणि त्या पाठोपाठ पंढरपूर येथे रेड झोन मधून आलेल्या रुग्णामुळे करोनाची लागण दिसून आली आहे.