खडका धरणातीलही पाणी संपल्यामुळे परळी औष्णिक केंद्रातील सर्व पाचही वीजनिर्मिती संच आता बंद पडले आहेत. पाच संचांतून साडेअकराशे मेगावॉट विजेची निर्मिती केली जाते. मात्र, वीजनिर्मिती थांबल्याने राज्यात एक हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण होणार आहे. वीजनिर्मिती केंद्र पूर्णपणे बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे.
परळी औष्णिक केंद्रात एकूण पाच संचांमधून १ हजार ३० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. मात्र, दोन वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे वीज केंद्राला पाणीपुरवठा करणारे धरण कोरडे पडले. त्यामुळे मागील वर्षांपासून परभणी जिल्हय़ातील मुदगल बंधाऱ्यातून पाणी घेतले गेले. त्यानंतर खडका धरणातून पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, या धरणातील पाणीही संपल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुरू असलेला अडीचशे मेगावॉट निर्मिती संचही बंद करावा लागला. अडीचशे मेगावॉट क्षमतेचे दोन व २१० मेगावॉट क्षमतेचे तीन अशा पाच संचांमार्फत १ हजार ३० मेगावॉट वीजनिर्मिती होते.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपले, तरी पाऊस न आल्यामुळे मागील आठवडय़ात तीन व नंतर एक असे चार संच बंद करण्यात आले. एकाच संचातून वीजनिर्मिती सुरू होती. मात्र, तीही आता बंद झाली आहे. यापूर्वी मागील वर्षी एप्रिलमध्ये खडका धरणातील पाणी संपल्यामुळे पाचही संच बंद करावे लागले होते. पाऊस पडल्याशिवाय व पाणीसाठा वाढत नाही, तोपर्यंत वीजनिर्मिर्ती केंद्र बंद राहणार आहे. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी वीजनिर्मिती केंद्राला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच केले होते. या वर्षी सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.