उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ‘एक गाव एक पोलीस कर्मचारी’ पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यादृष्टी पोलीस दलामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना आखल्याची माहिती, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांनी दिली आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पोलिसांचा हा नवा ‘उस्मानाबाद पॅटर्न’ निश्चित प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमून दिलेल्या गावात करोना पसरु नये याची जबाबदारी त्या-त्या पोलिस कर्मचार्‍यावर सोपवली आहे. संबंधित गावातील पोलीस पाटील, करोना वॉरियर्स, ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई यांच्या मदतीने गावात येणार्‍या प्रत्येकांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सदरील गावांमध्ये पोलीस, महसूल कर्मचारी कोरोना वॉरियर्सच्या मदतीने करोना संसर्गापासून बचावासाठी काम करणार आहेत. तुळजापूर, नळदुर्ग, तामलवाडी येथील अधिकार्‍यांना ‘एक गाव एक पोलिस कर्मचारी’ पॅटर्नच्या माध्यमातून करोना संसर्गापासून बचावासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सध्या तुळजापूर उपविभागात राबविण्यात येत असलेला हा ‘उस्मानाबाद पॅटर्न’ निश्चित पथदायी ठरणार आहे.

पोलिसांना करावे लागणार ही कामे
संंबंधित पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या गावास नियमित भेट देऊन, पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे मनोबल उंचावण्याचे काम करणे.होम व इन्स्टिट्युशनल क्वारटांईन व्यक्तींवर लक्ष ठेवणे. कोरोना बाबतीत तक्रारी आल्यास तात्काळ वरिष्ठांना कळवून त्यांचे निवारण करणे.  गावात आलेल्यांची माहिती लपविल्यास कारवाई करणे.मास्क न वापरणे व नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणे.