19 October 2020

News Flash

कांदा शंभरीपार करुनही शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूच; ६३३ किलोला मिळाले फक्त ६७१ रुपये

बातम्यांमध्ये शहरी भागात कांदा शंभरीपार गेल्याचे वृत्त पण शेतकऱ्याच्या हाती काहीच नाही

शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूच

अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काढणीस आलेला नवीन कांदा भिजल्याने खराब झाला असून जुन्या कांद्याचा साठादेखील संपत आल्याने कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नवीन कांद्याची आवक सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार असून तोपर्यंत सामान्यांना कांदा दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहेत. देशातील अनेक ठिकाणी कांद्याच्या दराने शंभरी गाठली आहे. असं असतानाच शेतकऱ्यांना मात्र एका किलो कांद्यामागे सव्वा रुपयांहून कमी रक्कम हाती पडत असल्याचे उघड झाले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सोलापूरमधील दिनेश ट्रेडर्सकडे ब्रम्हदेव रणदिवे या शेतकऱ्याने आपला ६३३ किलो कांदा विकला. या व्यवहारामध्ये सर्व खर्च वजा जाता ब्रम्हदेव यांना केवळ ६७१ रुपयेच हाती पडले आहे. विशेष म्हणजे सरकरने आडत हमाली बंदचा कायदा केला असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कापली जात आहे. या व्यवहाराची पावती सोलापूर जिल्ह्यामध्ये सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. एकीकडे बातम्यांमध्ये शहरी भागात कांदा शंभरीपार गेल्याचे वृत्त दाखवत असताना शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, शेतकऱ्याने जगावं की मरावं अशा अर्थाच्या मेसेजेससहीत या पावतीचा फोटो व्हायरल झाला आहे.

कांदा दरवाढीचे डिसेंबपर्यंत चटके

मॉन्सून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्र तसेच कर्नाटकात अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. काढणीस आलेला कांदा खराब झाला असून जुन्या कांद्याला जादा दर मिळत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या दोन्ही राज्यात झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याची आवक जवळपास थांबली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यापासून नवीन कांद्याची (हळवी) बाजारात आवक सुरू होते. सातारा जिल्ह्य़ातील लोणंद, फलटण, नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा भागातून कांद्याची आवक होते. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. काही भागात शेतात साठलेले पाणी निघण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. जुन्या कांद्याची (गरवी) आवक संगमनेर, शिरुर, मंचर, जुन्नर भागातून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बाजारात सुरू होती. मात्र, जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली, असे त्यांनी नमूद केले.

मार्केटयार्डातील घाऊक बाजारात बुधवारी ८० ट्रक कांद्याची आवक झाली. दहा किलो कांद्याला ४५० ते ५२० रुपये असे दर मिळाले. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने केली जात असून आणखी महिनाभर कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचे पोमण यांनी सांगितले.

फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली

महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कांद्याचा मोठा बाजार आहे. तेथील घाऊक बाजारात दररोज ५०० ते ६०० ट्रक नवीन कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. बंगळुरूतील बाजारपेठेत होणारी आवक मोठी असली तरी एकूण आवकेपैकी फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली आहे. उर्वरित कांदा अवेळी झालेल्या पावसामुळे खराब झाला असल्याचे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 5:17 pm

Web Title: onion prices goes beyond 100 rs kg farmer gets 671 rs for 633 kg scsg 91
Next Stories
1 “मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच फोन करा, अन्यथा करु नका”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला स्पष्ट संदेश
2 साम, दाम, दंड, भेद हा सत्तेचा माज आलेलेच वापरतात : संजय राऊत
3 मुख्यमंत्री शिवसेनेचाच हीच ठाम भूमिका-राऊत
Just Now!
X