महिनाभरापासून कांदा तेजीत असला तरी या उलट स्थिती वांग्याची आहे. उत्पादन खर्च मिळत नसल्याने काही निराश शेतकरी बाजार समितीत वांगे फेकून देत आहे. येवला बाजार समितीत वांग्याला प्रति कॅरेट (२० किलो) २० रुपये दर मिळाले. म्हणजे एक रुपया किलोने वांग्याला बोली लागली. भोपळा, भेंडी, मेथी, मिरचीचे लिलाव कमी दराने झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. गेल्या काही वर्षांत हवामानाचा लहरीपणा पाहता शेती आतबट्टय़ाचा व्यवसाय ठरत आहे. कोणते पीक कधी घ्यायचे, याचा अंदाज करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. शेतात तयार झालेला माल भाव नसल्याने भाजीपाल्यासारखे पीक अनेकदा शेतातच सोडून दिले जाते. बाजार समितीत आणलेला माल भाव न मिळाल्यास शेतकरी तो रस्त्यावर फेकून दिल्याची काही उदाहरणे आहेत. महिनाभरापासून कांदा भाव खात आहे. त्याचे भाव उंचावले असले तरी नुकसानीमुळे घटलेले उत्पादन आणि खर्च पाहता उत्पादकाला फारसा लाभ होत नसल्याचे सांगितले जाते. शनिवारी येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी पाच हजार रुपये दर मिळाले. अवकाळी पावसामुळे उत्पादन कमालीचे घटलेले आहे. यामुळे अल्प प्रमाणात हाती आलेला कांदा शेतकरी रिक्षाने बाजारात आणतात. या दिवशी रिक्षा उपलब्ध न झाल्याने काही जण बैलगाडीत भरून कांदा विक्रीस आणला होता. काही शेतकऱ्यांना बैलगाडीभरून कांद्याचे ४० ते ४५ हजार रुपये मिळाले. दुसरीकडे वांग्यासह भाजीपाल्यास भाव नव्हता. एक शेतकरी आपल्या मुलांबरोबर दुचाकीवर वांगीने भरलेले दोन कॅरेट बाजारात आणले. एक कॅरेट २० किलोचे असते. सुमारे ४० किलो वांगी त्यांनी बाजारात लिलावास आणली होती. कांदा लिलावानंतर भाजीपाल्याला लिलाव झाला. वांग्याला २० रुपये कॅरेट इतका कमी दर मिळाला.

निराश शेतकऱ्याने वांगी बाजाराच्या आवारात फेकून दिली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार वांग्याला (प्रति कॅरेट) २० ते ८० रुपये, टोमॅटो ८० ते १२० रुपये, भोपळा ५० रुपये, सिमला मिरची १५० ते २०० रुपये असे दर मिळाले. मेथीला १०० ते २०० रुपये शेकडा, कोथिंबीर १०० ते २००, मिरची आणि काकडीला किलोला प्रत्येकी १० रुपये दर मिळाले. बाजार समितीच्या आवारात फेकलेले वांगे जनावरांचे खाद्य ठरल्याचे पाहायला मिळाले.