पंढरपूर : अधिक मासानिमित्त परमात्मा विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या कालावधीत ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच चंद्रभागा नदीच्या तीरावर महिलांसाठी ८ चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक नागरिकांसाठी या काळात दर्शनासाठी सकाळची वेळ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

बुधवारपासून अधिकमास अर्थात पुरषोत्तम मास सुरवात झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या महिन्याच्या कालावधीत राज्यासह इतर राज्यातून भाविक दर्शनाला येतात. या पाश्र्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. दररोज अंदाजे १ लाख भाविक पंढरीत दाखल होतील, अशी शक्यता गृहीत धरून मंदिर समितीने नियोजन केले आहे.

देवाचे पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांना उन्ह,पाऊस याचा त्रास होऊ  नये म्हणून शेडनेट उभारण्यात आले आहे. तर पायाला चटके बसू नये म्हणून मॅटिंग बसविण्यात आले आहे. तसेच विश्व सामाजिक अनास्था,आळंदी, जि. पुणे संस्थेद्वारा दर्शन रांगेतील भाविकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी माहिती दिली.

या शिवाय मंदिर समितीने या अधिक मासात व्हीआयपी आणि ऑनलाइन दर्शन सेवा बंद ठेवली आहे. रांगेतील भाविकांना जलद दर्शन व्हावे याकरिता ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने चंद्रभागा नदीच्या तीरावर महिलांसाठी ८ चेंजिंग रूम उभारण्यात आल्या आहेत. तसेच ८० सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याचे ढोले यांनी सांगितले. येणाऱ्या भाविकांना देवाचे दर्शन जलद व्हावे या करिता मंदिर समितीने नियोजन केले आहे.