मनमाडजवळील प्रकार; शिक्षक वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया

मनमाड : शालाबाह्य़ कामांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याचा मूळ उद्देश सोडून विविध व्यापात गुंतलेल्या शिक्षकी पेशाला किती भीषण तणावाचा सामना करावा लागत आहे याचे उदाहरण मनमाडजवळील मुख्याध्यापकाने केलेल्या आत्महत्येतून समोर आले आहे. शालाबाह्य़ ऑनलाइन कामाचा ताण, त्यातच शाळेचा निकाल लावण्याची कालमर्यादा गाठतांना मानसिक संतुलन ढासळल्याने मुकुंद मनोहरदास शोभावत (५४) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. शोभावत हे चांदवड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

शोभावत हे अनेक वर्षे नांदगाव तालुक्यातील मोहेगाव शाळेत कार्यरत होते. सध्या त्यांची चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत श्रेणीपात्र मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने विद्यार्थी माहिती या योजनेतील ३९ कलमी अर्ज प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरून ऑनलाइन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी त्याची शेवटची मुदत होती. तसेच शाळेचा यावर्षीचा निकाल तयार करून त्यास गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्याची मुदतही याच दिवशी होती. या सर्व कामाचा एकत्रित तणाव आल्याने तो सहन न होऊन या शिक्षकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तशी चिठ्ठी शोभावत यांनी लिहून ठेवलेली आढळली. या घटनेमुळे शिक्षण विभागाकडून लादल्या जाणाऱ्या शिक्षणबाह्य़ कामांमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची होणारी दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा गुरुवारी शिक्षक वर्तुळामध्ये होती.

शोभावत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून शालाबाह्य़ कामाचा प्रचंड ताण होता. तो सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्ती शिक्षकांनी दिली. शोभावत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

होतेय काय?

ऑनलाइन माहिती भरणे, निकालासंबंधीची कामे तसेच शालेय पोषण आहाराअंतर्गत शिल्लक धान्याचा साठा मोजणे, शासनाच्या योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचा अहवाल देणे आदी कामेही शिक्षक, मुख्याध्यापकांना करावी लागत आहेत. ऑनलाइन सादरीकरणासाठी ग्रामीण भागात इंटरनेटला रेंज न मिळण्यापासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्ग सध्या दहशतीखाली जगत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्व राज्यभरातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची स्थिती सध्या अशीच असल्याचे समाजमाध्यमांतून गुरुवारी व्यक्त होत होते.

शिक्षक कातावलेले..

शिक्षण घेताना आकलन न होणाऱ्या अभ्यासामुळे विद्यार्थी जितके धास्तावतात, त्याहून अधिक  सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांची दयनीय अवस्था झाली आहे. माध्यान्य भोजनासाठी दिलेल्या धान्यांच्या अनेक वर्षांच्या गोणी शोधून त्या विकण्याचे काम करण्यापासून ते अचानक येणाऱ्या आदेशांनुसार ऑनलाइन माहितीच्या अनेक तक्त्यांतील नोंदीत गेल्या आठवडाभर अडकलेल्या शिक्षकांना शाळांचे निकाल लावताना तारेवरची कसरत करावी लागल्याच्या प्रतिक्रिया कातावलेले शिक्षक समाजमाध्यमांवर  मांडत होते.