गुजरातची आजची स्थिती व गुजरातला प्रगतीपथावर नेण्यात तेथील कष्टाळू वा उद्यमशील लोकांचे मोठे योगदान आहे; पण केवळ गुजरात म्हणजे देश नाही. गुजरात हे एकच राज्य देशात आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ‘इंडिया शाईिनग’ व ‘फिल गुड’चा फुगा फुटला, त्याच धर्तीवर या वेळीही होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.
काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बठकीत पवार यांनी मार्गदर्शन केले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, जयप्रकाश दांडेगावकर, बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, स्वराज परिहार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी आमदार कुंडलिक नागरे, जि. प. अध्यक्षा मीना बुधवंत, माजी खासदार तुकाराम रेंगे, शिवाजी माने, डॉ. विवेक नावंदर, आनंद भरोसे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी सावरला पाहिजे. निवडणुका येतील-जातील. पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देणे महत्त्वाचे आहे, असे पवार म्हणाले. टोपे, खान, वरपुडकर, भांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषणे झाली. पवार यांचे बठकस्थळी सायंकाळी आगमन झाले,  या वेळी पावसाचा जोर चालूच होता. पडत्या पावसातही बठकीला दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
आघाडीची जबाबदारी
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहे. काँग्रेसच्या २७ जागा जिंकून आणण्याची जबाबदारी माझी व राष्ट्रवादीच्या २१ जागा जिंकण्याची जबाबदारी काँग्रेसची असेल. आम्ही दोघे स्वतंत्र लढलो असतो तर विरोधकांचे फावले असते. कदाचित त्यांचा सत्तेपर्यंत जाण्याचा मार्गही सुकर झाला असता, याची जाणीव आम्हा दोघांनाही आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.