तो गायला लागला की, हृदयाला पान्हा फुटे. काही कळायच्या आत डोळ्याच्या कडा ओलावत. त्याच्या गाण्याने अनेकांना वेड लावले. या गोड गळ्याच्या १४ वर्षीय अनाथ गायकाला आई-वडिलांकडून एचआयव्हीसारखा दुर्धर आजार वारशानेच मिळाला. ‘उसवलं गणगोत सारं..आधार कुणाचा नाही..’ हे गीत त्याच्या तोंडून अनेकांनी ऐकले. मात्र, आज त्याच्याच आयुष्याचा समारोपही अगदी असाच झाला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एचआयव्ही बाधीत किरणला हृदयाचा झटका आला आणि त्याचा स्वर कायमचा शांत झाला. कळंब येथील सहारा बालगृहात एचआयव्ही बाधीत ५० मुले आहेत. निरागस, निष्पाप अशा या मुलांच्या आयुष्यातील आनंदही शापित आहे. इतर अनाथ मुलांसारखाच किरणसुद्धा माता-पित्याच्या चुकीची शिक्षा भोगत या ५० मुलांमध्ये उठून दिसायचा. कळंब परिसरातील अनेकांना त्याचा लळा लागला होता. त्याने कानावर हात ठेवून स्वर लावला की, समोरचा कितीही पाषाणहृदयी असो अगदी गलबलून जात असे. त्याच्यामुळे बालकाश्रमाचा ‘आवाज’ खऱ्या अर्थाने जिवंत होता. परंतु उमलण्याच्या वयातच काळाने त्याच्यावर झडप घेतली आणि आपल्या आवाजाच्या जादुगिरीने अनेकांना सहारा एचआयव्ही बाधीत बालकाश्रमाकडे खेचण्याची ताकद असणारा किरण शांत झाला.
कळंब शहरातील एचआयव्ही अनाथ मुलांचे केंद्र अनेक कारणांमुळे समाजातील विविध घटकांना आपली दखल घेण्यास भाग पाडते. या बालगृहातील विद्यार्थ्यांना भलेही एका शापित आजाराने घेरले असले, तरी त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. त्यांनाही सर्वसामान्य मुलांप्रमाणे प्रतिष्ठा मिळावी, या साठी संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण रात्रंदिवस या ५० मुलांची आई आणि वडील होऊन सावलीसारखी त्यांची पाठराखण करतो. येथील विद्यार्थ्यांना नृत्य, क्रीडा, गायन, चित्रकला, हस्तकला यात तरबेज करण्यासाठी त्याचा सुरू असलेला खटाटोप समाजाच्या नजरेतून कधीच सुटला नाही. दोन वर्षांपूर्वी किरण ‘कलंक’ घेऊनच बालगृहात दाखल झाला. कलंक काय, तर आई-वडिलांच्या चुकीमुळे कपाळावर पडलेला एचआयव्ही बाधीत हा न पुसणारा शिक्का. बालगृहात दाखल होताच त्याने अल्पावधीतच सर्वाना आपलेसे केले. त्याचा गळा बालकाश्रमाची ओळख झाला. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव, शिवजन्मोत्सवात किरणच्या गाण्याला मोठी दाद मिळू लागली. आपल्या गायकीच्या जोरावर त्याने अनेक पारितोषिकेही पटकावली. गाण्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेणाऱ्या किरणची दखल आकाशवाणीनेही घेतली. त्याने गायिलेली अनेक गाणी कळंबवासीयांच्या लक्षात आहेत.