सरकारने वादळाचा फटका बसलेल्या सर्वांना तात्काळ मदत करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.तसंच कोकणाने शिवसेनेला आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे, आता शिवसेनेने कोकणाला देताना हात आखडता घेऊ नये असंही फडणवीस म्हणाले. तौते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी ते सध्या करत आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आंब्यांची झाडं,बागा किंवा इतर बागा यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास १०० बोटींचं नुकसान झालेलं आहे. जवळपास १०० शाळांवरच्या छताचं नुकसान झालं आहे. अनेक आरोग्य केद्रांचंही नुकसान झालेलं आहे, अजूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करणं सुरु आहे.त्यानंतर खरं किती नुकसान झालं आहे ते कळेल. आम्ही निसर्ग चक्रीवादळाविषयीही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी निसर्ग चक्रीवादळासाठी सरकारने दिलेले १५० कोटी रुपये वाटल्याची माहिती दिली. रत्नागिरीसाऱख्या मोठ्या जिल्ह्याला जर केवळ १५० कोटी रुपये आले असतील तर या भरपाईच्या घोषणा पोकळ आहेत.”

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र दौरा वादात, ई-पास काढलाय का?; माहिती अधिकारात विचारणा

ते पुढे म्हणतात, “शिवसेनेला कोकणाने भरपूर दिलं पण आता कोकणाला देण्याची वेळ आली आहे तर शिवसेना हात आखडता घेत आहे. केंद्राकडे बोट दाखवणं सुरुच आहे. सरकारने योग्य प्रकारे मदत केली पाहिजे.”

जिल्ह्यातल्या करोनाच्या परिस्थितीसंदर्भातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. याबद्दल माध्यमांशी बोलताना लोकप्रतिनिधींनी करोना काळात केलेल्या मदतीबद्दल सांगितलं. तसंच आम्ही सरकारला मदत करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर जास्त आहे. कदाचित राज्यात सर्वाधिक मृत्यूदर याच राज्याचा असेल. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, परिसरातले आमदार, लोकप्रतिनिधी या सर्वांनी राज्यात सहा कोविड सेंटर उभारली आहेत. तसंच आम्हीही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या बँक्स जिल्ह्याला दिल्या आहेत. नारायण राणे यांनी जिल्ह्यासाठी मेडिकल-पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करुन दिला आहे. आम्ही आम्हाला शक्य असेल ती मदत सरकारला करायला तयार आहोत.

हेही वाचा- Cyclone Tauktae : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाही मदत मिळणार; मात्र यावर जाणीवपूर्वक राजकारण सुरू!