काँग्रेसच्या जाहिरनाम्याची थोडी तरी माहिती घ्या आणि सरकारने दिलेल्या बदलाचा प्रस्ताव पाहा, हे पाहिलं असतं तर तुमच्यावर कृषी कायदे सुधारणांबाबत पत्र लिहिण्याची वेळच आली नसती, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

ट्विटद्वारे अशोक चव्हाणांना उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, “जाऊ द्या तुमच्या पक्षाचा जाहिरनामा तुम्हीच पहाणार नाहीत, गंभीरतेने घेणे दूरच पण थोडी माहिती तरी घ्या. कायदा पाहा, सरकारने दिलेला बदलाचा प्रस्ताव पाहा. ते पाहिले असते तर पत्र लिहायची वेळ आली नसती”

दरम्यान, “केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हीत जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता आहे,” असं अशोक चव्हाण यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं. याबाबत आपण आज कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र पाठवल्याचेही चव्हाण यांनी म्हटलं होतं. यासोबत त्यांनी संबंधित पत्राची प्रतही जोडली होती.