लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील सध्याचा सरासरी करोना मृत्यूदर १.७३ टक्के इतका असून मृत्यूदर घटवण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्य सरकारची मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ४ लाख ९५ हजार कुटुंबीयांची पाहणी करून कुटुंब सदस्यांची माहिती ७४० पथकांकडून संकलित केली जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या ११ हजाराहून अधिक करोना संसर्गाचे रुग्ण आढळले असून चाचणी केलेल्या नागरिकांच्या सुमारे २१ टक्के नागरिकांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ८६.३ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ३४ दिवसांवर पोहोचला आहे. असे असले तरी १९१ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला असून वसई ग्रामीण, पालघर, डहाणू व वाडा तालुक्यातील मृत्यूदर अधिक आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला नागरिकांकडून सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी (आज) शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्ह्यात २१ सप्टेंबर पासून या मोहिमेचा आरंभ होणार असून आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या सह दोन स्वयंसेवकांच्या माध्यमातून आरोग्य पथकामार्फत दररोज ५० घरांची पाहणी केली जाणार आहे. या पाहणीत ताप, spo2 रक्तातील प्राणवायूची मात्रा, करोना सदृश्य लक्षणे, इतर आजार व व्याधी यांची माहिती संकलित करून आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना ताप निदान केंद्र (फीवर क्लीनिक) येथे संदर्भसेवा करण्यात येणार आहे. यामुळे गंभीर होऊन उपचारासाठी रुग्णांच्या दाखल होणाऱ्या संख्येत तसेच मृत्यू दरात घट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाशी लढा देताना अनेक त्रुटी व मर्यादा पुढे येत असल्याची माहिती देऊन जिल्हाधिकारी यांनी रुग्णसेवेसाठी अधिक डॉक्टर मिळावेत म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकाला पत्र लिहिले आहेत. तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करताना याकामात निर्माण झालेल्या समस्यांवर यशस्वी तोडगा काढून त्यांचे सहकार्य प्राप्त करून घेण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

रुग्णांची मानसिक स्थिती व्यवस्थित राहावी यासाठी करोना उपचार केंद्रांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नियुक्ती करण्यात येणार असून रुग्णांना अधिक प्रमाणात करमणुकीची साहित्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. सर्व समर्पित करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगत उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात लागणाऱ्या इंजेक्शन व सीटी स्कॅन आकारणी शासकीय दरानुसार होईल, यासाठी उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच ग्रीव्हीयान्स पोर्टल- तक्रार निवारण सुविधा उभारण्यात येणार असून कोविड उपचार करिता उपलब्ध खाटांची माहिती देणारे पोर्टल सातत्यपूर्वक अपडेट करण्यात येईल असे सांगितले. ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रसार ही चिंतेची बाब असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगून शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. याकरिता जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी दर शनिवारी आढावा बैठक घेण्यात येणार असून या मध्ये खासगी डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सिटीस्कॅन प्रकारांमध्ये कोट्यावधीची गैरव्यवहार?
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांना आरोग्य अधिकारी सिटी स्कॅन करण्यासाठी पाचारण करत असत. शासकीय सिटी स्कॅन चे दर २२०० रुपये असताना अनेक रुग्णांनी ३५०० ते ४००० रुपये पर्यंत भरल्याचे दिसून आले आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिटी स्कॅन साठी पाठवलेल्या रुग्णांचे शुल्क शासन कालांतराने भरणार असल्याचे जिल्ह्याच्या शल्य चिकित्सक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, मात्र प्रत्यक्षात यापैकी बहुतांश रुग्णांनी स्वतःच्या खिशातून सिटी स्कॅन शुल्काचा भरणा केल्याने या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.