काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या २२ रूग्णांचा ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती आज (सोमवारी) संध्याकाळी ६ वाजता पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात हाताणे जवळील ‘रिव्हेरा’ या शासकीय समर्पित करोना रूग्णालय घडता घडता सुदैवाने टळली.

रिव्हेरा रुग्णालयातील जम्बो ऑक्सीजन टँकच्या वॉल्व्हमधून गळती झाल्याने झाल्याने ऑक्‍सिजन गळतीला सुरुवात झाली होती. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच खळबळ माजली होती.

मात्र, प्रसंगावधान राखून पाईपलाईन मध्ये सुरु झालेली गळती ताबडतोब दुरुस्त करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या रुग्णालयात ३०२ रुग्ण उपचार घेत असुन एकूण १५० रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ. रामदास मराड यांनी दिली आहे.

या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. तर, या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी रिव्हेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉ. प्रशांत राजगुरू यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जम्बो ऑक्सिजन टँकमधून येणारा ऑक्सिजनची पाईप सैल झाल्याने थोड्याप्रमाणात गळती सुरू झाली होती. मात्र हे लक्षात येताच तत्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे. अशी माहिती रिव्हेरा रूग्णालयाचे अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ. रामदास मराड यांनी दिली आहे.