21 October 2020

News Flash

बदली झालेल्या अभियंत्याच्या घरी पालघर नगर परिषदेचे ‘प्रतिकार्यालय’

अभियंता आपल्या कार्यकाळातील तारखांनुसार संबंधित बांधकाम प्रकरणे हाताळत असल्याचे सांगण्यात येते. 

धक्कादायक प्रकार उघडकीस, बांधकाम परवानगीच्या अनेक नस्ती सापडल्या

पालघर : पालघर नगर परिषदेकडे बांधकाम परवानगीसाठी दाखल झालेली शेकडो प्रकरणे आणि त्यांच्या नस्ती बदली झालेल्या एका अभियंत्याच्या घरात सापडल्याने खळबळ माजली आहे. हा बदली झालेला अभियंता आपल्या कार्यकाळातील तारखांनुसार संबंधित बांधकाम प्रकरणे हाताळत असल्याचे सांगण्यात येते.

विशेष म्हणजे या अभियंत्याच्या घरी काही वास्तुविशारद, ठेकेदार, विकासक बांधकाम परवानग्या घेण्यासाठी उपस्थित असताना त्यांना काही नगरसेवकांनी रंगेहाथ पकडल्याने पालघर नगर परिषदेचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

नगर परिषदेच्या हद्दीबाहेर माहीम ग्रामपंचायतीमध्ये ‘कांचन पारिजात’ इमारत आहे. या इमारतीतील एक सदनिका नगर परिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या सदनिकेत नगर परिषदेच्या शेकडो फाइल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची कुणकुण काही नगरसेवकांना लागली होती. क्षीरसागर यांची तीन महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतरही ते अधूनमधून पालघरमध्ये येत असत आणि जुन्या प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील तारीख टाकून परवानगी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक या सदनिकेच्या ठिकाणी आले. तेथे काही वास्तुविशारद, विकासक व ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांविषयी चर्चा करत असल्याचे त्यांना  आढळले. त्याचबरोबर पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे आणि यंदाच्या जूनमधील बांधकाम परवानगीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेजही तेथे नगरसेवकांना आढळले.

विशेष म्हणजे या कागदपत्रांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांचा समावेश असून काही गहाळ झालेली कागदपत्रे आणि फायलीही या ठिकाणी सापडल्याचा दावा करण्यात करण्यात येत आहे.

पालघर नगर परिषदेच्या कार्यालयात मुबलक जागा असताना विकासकांची अडवणूक करून पैसे उकळण्याचा उद्देशाने महत्त्वपूर्ण दस्तावेज कार्यालयाबाहेर नेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी केले आहेत. हा कारभार संबंधित अभियंता, बदली झालेले अभियंता तसेच मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप होऊ  लागले आहेत.

याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

– प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 5:00 am

Web Title: palghar municipal council many files found in transferred engineer home zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
2 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांमध्ये यंदापासूनच मराठा आरक्षण
3 राज्याच्या निम्म्या भागात पेरण्या खोळंबल्या
Just Now!
X