नीरज राऊत

राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यापासून ३१ डिसेंबपर्यंतच्या काळात दस्तावेज नोंदी शुल्कामध्ये सवलत दिली आहे. ती संपत असताना ‘बीएसएनएल’च्या इंटरनेट सेवेतील तांत्रिक अडचणीचे दुष्टचक्र काही संपत नाही. सेवा अनेकदा खंडित होत असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाप्रमाणे टपालसेवा व एलआयसीसारख्या कार्यालयाला त्याचा फटका बसत आहे. सेवेच्या प्रतीक्षेत तासन्तास तर कधी दिवसभर ताटकळत थांबण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

राज्य सरकारने दस्तावेज नोंदणीकरिता सवलत जाहीर केल्याने सप्टेंबरपासून सदनिका व घरांच्या नोंदणीच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. कोविड काळात २५०-३०० दस्तावेजांची नोंदणी असलेली संख्या डिसेंबर महिन्यात ९०० च्या घरात पोहोचली आहे. पालघर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज किमान ६० दस्तावेज नोंदवण्याची क्षमता असताना खंडित होणाऱ्या बीएसएनएल इंटरनेट सेवा अनेकदा कमी प्रमाणात दस्तावेज नोंदवण्यात येत असल्याची माहिती दुय्यम निबंधक प्रमोद चिंचघरे यांनी दिली. त्याच पद्धतीने इंटरनेटचा वेग कमी असल्याने दस्तावेज अपलोड करण्यास मर्यादा येत असल्याचेदेखील सांगण्यात आले.

पालघर तालुक्यातील अनेक ठिकाणी डाकघरांमध्ये बीएसएनएलची सेवा खंडित होत असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या ग्राहक व एजंटांची गैरसोय होताना दिसते. गेल्या महिन्याभराच्या काळात इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे वाया गेलेल्या दिवसांची संख्या १२ ते १५ पर्यंत आल्याचे डाक विभागाच्या एजंटांचे म्हणणे आहे. बीएसएनएलकडे मनुष्यबळाची तसेच साधनसामुग्री व तज्ज्ञांची कमी असल्याने खंडित झालेल्या इंटरनेट सेवेला पूर्ववत करण्यास विलंब होताना दिसून येतो.

जीवन विमा निगम एलआयसी यांच्या बोईसर कार्यालयात बीएसएनएल इंटरनेट खंडित सेवेचा परिणाम ग्राहक सेवेवर होताना दिसून येतो. त्याचप्रमाणे एलआयसीच्या ठाणे येथील ग्राहक सव्‍‌र्हर बदलण्याचे प्रस्तावित असताना त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जात नसल्याने इंटरनेट वेगाच्या सोबतीने सव्‍‌र्हरमुळेदेखील चौकशी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास थांबावे लागते. करोना काळात सामाजिक अंतर पाळण्यासाठी ग्राहकाने कार्यालयात चौकशीसाठी गर्दी करण्याऐवजी एलआयसीच्या मोबाइल अ‍ॅप तसेच २४ तास सुरू राहणाऱ्या या कॉल सेंटरची मदत घ्यावी. असे शाखा व्यवस्थापकांनी आवाहन केले आहे.

महिना दस्तावेज    मुद्रांक शुल्क (लाख रु)   नोंदणी शुल्क (लाख रु)

एप्रिल   ०  ०  ०

मे ४८ ५९.९५  ७.०१

जून २४९ २६९.५३ ३३.४३

जुलै ३३१ ५१६.४६ ३.६५

ऑगस्ट २६५ २१३.३२ २९.९१

सप्टेंबर ५२० २४९.८८ ६३.६३

ऑक्टोबर   ५९२ ४०७.८५ ७४.६३

नोव्हेंबर     ६०४ ४३९.९२ ८१.५४

खोदकामात ‘केबल’ तुटण्याकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्ग लगत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात विविध कामांसाठी खोदकाम करण्यात येते. अशा वेळी ठेकेदारांच्या बेजबाबदारीमुळे ऑप्टिकल फायबर केबल  (ओएफसी) तुटल्याचे समजल्यानंतरदेखील तो भाग उघडा न ठेवता मातीने पुन्हा भरून टाकण्यात येतो. परिणामी तुटलेल्या केबलचा शोध घेणे तसेच ती पूर्ववत करण्यास विलंब होत असल्याची माहिती बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. शासकीय कार्यालय, राष्ट्रीयीकृत बँका तसेच इतर ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट सेवा घेण्याचे अनिवार्य करण्यात आल्याने ग्राहक सेवेवर इंटरनेट सेवेचा परिणाम होताना दिसून आले आहे.