करोना टाळेबंदीच्या काळात मार्च महिन्यापासून बंद असलेला पर्यटन व्यवसाय आठ-नऊ महिन्यांच्या काळानंतर नाताळ व वर्षां अखेरीसच्या निमित्ताने पुन्हा एकदा भरून आला आहे. पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच सलग लागून आलेल्या सुट्टय़ांमुळे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे.

पर्यटन उद्योग ऑक्टोबर अखेरीस सुरू झाला तरी दिवाळीच्या हंगामात नागरिक घरा बाहेर पडल्यास घाबरत होते. त्यामुळे दिवाळी व नंतर काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या समुद्र किनारे व इतर पर्यटन स्थळी येणाऱ्या नागरिकांची संख्या मर्यादित राहिली होती.  उद्योगात कार्यरत कर्मचारी मूळ गावी गेल्याने पर्यटन उद्योग पूर्ववत होण्यास काही वेळ लागला होता. गावी गेलेली मंडळी परतली असून हा उद्योग पुन्हा एकदा पूर्वपदावर आला आहे.  केळवा, माहीम, दातीवरे, बोर्डी, डहाणू इत्यादी किनारपट्टीच्या गावांमध्ये पर्यटकाने एकच गर्दी केली आहे. त्याच प्रमाणे वर्षांखेरीस या निमित्ताने अशा पर्यटन स्थळ येऊ पाहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

पुढील काही दिवसांसाठी या भागातील हॉटेल— रिसॉर्ट येथील बुकिंग पूर्ण झाले असून वास्तव्य करण्यासाठी पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत आहे.

किनारपट्टीच्या गावांचा इतर ठिकाणी देखील हॉटेल व रिसॉर्ट मध्ये गर्दी होऊ लागली असून सुमारे आठ महिने करोनाची झळ पोचलेला पर्यटन उद्योग नव्याने बहरून निघाला आहे. सध्या पालघर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून अशा थंड वातावरणाचा व निसर्गरम्य परिसराचा आनंद पर्यटक घेताना दिसून येत आहेत.

गुजरातकडे जाण्यासाठी गर्दी

सलग आलेल्या सुट्टय़ांना मुंबई व उपनगरातील अनेक कुटुंब गुजरात राज्यकडे निघाल्याचे दिसून आले. खानिवडे तसेच डहाणू (चारोटी) येथील टोल नाक्यांवर एक ते दीड किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा सकाळच्या सत्रात लागल्याचे दिसून आले.