पंढरीतून भाविक परतू लागले; सर्वदूर पावसाने समाधान

‘‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता,’’ अशी आर्त विनवणी विठुरायाला करीत पंढरीतून भाविक परतू लागले आहेत. आषाढी एकादशीला सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक मोठय़ा संख्यने पंढरीला आले होते. एकादशीचा उपवास सोडून द्वादशीला वारकरी आपआपल्या गावी परतू लागला आहे. संतांच्या पालखी पौर्णिमेला गोपाळकाला झाल्यावर परतणार आहेत.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी पंढरीची वारी नित्याने करतात. यंदाच्या आषाढी यात्रेला राज्यासह देशातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते. या वर्षी सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महराष्ट्र, मुंबई आणि कोकणातून भाविक पेरणीची कामे उरकून पंढरीच्या वारीला आला होता. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक समाधानी झाला. येथील प्रसाद म्हणून कुंकू, बुक्का आणि चिरमुरे तसेच देव देवतांचे फोटो तसेच तुळशीमाळा खरेदी करून भाविक परतू लागला.

यंदाची आषाढी ह निर्मल वारी करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता. तसेच स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांची संख्या ध्यानात घेऊन प्री-फॅब्रिकेटेड आणि कायमस्वरूपी शौचालये उभी केली होती. चंद्रभागेच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत वारकऱ्यांची निवासाची सोय केली होती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराममहाराज आणि प्रमुख संतांच्या पालख्या पौर्णिमेला म्हणजे १९ जुल रोजी गोपाळकाला करून परतीचा प्रवासाला लागणार आहेत.

एसटी महामंडळ तोटय़ात

यंदाच्या आषाढी यात्रेसाठी भाविकांनी एस.टीकडे पाठ फिरवली.आषाढीसाठी मुंबई,पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या विभागातून ३ हजार ३५३ गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. केवळ अमरावती विभागातून आणि नाशिक विभागातून भाविक वाढले. पुणे विभातून भाविकांची संख्या घटलेली दिसून आली. गेल्या वर्षी ३ लाख ६६ हजार प्रवासी होते, तर यंदाच्या वर्षी ३ लाख १४ हजार प्रवाशांनी एस.टी.चा प्रवास केला. म्हणजे जवळपास ५२ हजार प्रवाशांनी पाठ फिरवली. तसेच गेल्या वर्षी ६ कोटी ८३ लाख उत्पन्न मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी ६ कोटी ३६ लाख उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे तब्बल ४७ लाखांचा फटका महामंडळाला बसला आहे.