सासुरा येथे संत एकनाथमहाराज सुवर्णमहोत्सवी सप्ताहात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सुसंस्कृत समाज निर्माण करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून, शुद्ध विचारानेच चांगल्या समाजाची निर्मिती होते. स्वार्थी माणूस कधीच समाजसुधारणा करू शकत नाही, असे सांगितले होते. तर दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याच कार्यक्रमात हजेरी लावून पंकजा मुंडे यांच्या टीकेचा समाचार घेताना हे धार्मिक व्यासपीठ असून, काल ज्यांनी आपल्यावर टीका केली त्यांचाशी लढायला आणि उत्तर देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. योग्य वेळी समाचार घेऊ, असा इशाराच दिला. धार्मिक कार्यक्रमांना दोन्ही नेत्यांनी लागोपाठ हजेरी लावत परस्परांवर शाब्दिक वार करण्याची संधी साधल्याने धार्मिक कार्यक्रमातही राजकीय चर्चाच रंगल्या.
केज तालुक्यातील सासुरा येथे संत एकनाथमहाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहात शुक्रवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्या वेळी मुंडे म्हणाल्या, सुसंस्कृत समाज निर्माण करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. शुद्ध विचारानेच चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. मला सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेच्या मनात स्थान मिळवायचे आहे. स्वार्थी माणूस कधीच समाजसुधारणा करू शकत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी याच धार्मिक कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावत काल आपल्यावर धार्मिक कार्यक्रमातून टीका करणाऱ्यांना या व्यासपीठावरून आपण उत्तर देणार नाही, त्यांच्याशी लढायला अनेक ठिकाणे आहेत. योग्य वेळी समाचार घेऊ, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना इशारा दिला. सासुरा येथील रेणुकामाता कृषी प्रतिष्ठानच्या जनावरांच्या चारा छावणीस पंकजा मुंडे यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्तांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. धनंजय मुंडे यांनी नांदुर फाटा येथील तानाजी कदम यांच्या चारा छावणीस भेट देऊन सरकारकडून दुष्काळग्रस्त भागाची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे.
चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री पंकजा मुंडे उपाध्यक्ष असलेल्या उपसमितीनेच घेतला होता, मात्र राष्ट्रवादी आणि जनतेच्या रेटय़ामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागला. मी पुरावे घेऊन उभे राहिलो तरी विद्यमान पालकमंत्र्यांना भविष्यात अवघड जाईल, असा इशारा देत लोकांना भावनिक करून पालकमंत्री वेळ मारून नेत असल्याची टीकाही त्यांनी केली. दोन दिवस केज मतदारसंघात पालकमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी लागोपाठ दौरा करून प्रत्येक ठिकाणी परस्परांना लक्ष्य करण्याची संधी साधली, त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात परस्परविरोधी नेत्यांची राजकीय टीकाटिप्पणीच चच्रेत राहिल्या.