पंकजा मुंडे यांच्याकडून आयाराम धोरणाचे समर्थन

इतर पक्षांतील मोठे नेते भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढण्यास मदतच होणार आहे, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीचे समर्थन केले.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्र व राज्य सरकारची कामगिरी चांगली झाल्याचा दावा पक्ष करत असेल तर उमेदवार ठरवताना, बदलताना इतर पक्षांतील उमेदवारांना आयात करण्याची गरज का पडते? पक्षासाठी पर्यायी उमेदवार तयार करण्यात पक्ष संघटना अपयशी ठरली का? असे विचारता, पक्ष संघटना अपयशी ठरण्याचा प्रश्न नाही. निवडून येऊ शकतील असे इतर पक्षांतील चांगले नेते भाजपमध्ये येत असल्याने पक्ष संघटनेचीच ताकद वाढत आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षांतील चांगल्या नेत्यांना घेण्याचे धोरण आहे, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांमुळे जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला.  ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा सरकारचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे, असेही त्या म्हणाल्या.