‘स्वाभिमान मेळाव्या’तून आज परळीत शक्तिप्रदर्शन

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

गोपीनाथ गडावर गुरुवारी होणाऱ्या स्वाभिमान मेळाव्यातील उपस्थिती आणि त्यात मांडली जाणारी भूमिका यावर भाजपमध्ये फुलविण्यात आलेले ‘माधव’चे सूत्र किती काळ भाजपबरोबर राहील, हे ठरण्याची शक्यता आहे. या मेळाव्यासाठी काढण्यात आलेल्या फलकांवर पुन्हा एकदा कमळाचे चिन्ह आले आहे. त्यामुळे नवी राजकीय मांडणी होण्याची शक्यता कमी असली तरी ‘माळी-धनगर-वंजारी’ ही ‘माधव’ची शक्ती भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचा पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांनी दिलेला संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे.

पंकजा मुंडे यांनी ‘मावळ्यां’ना साद घातल्याने त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे, यावरून अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी औरंगाबाद शहरातील गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे वेगळ्य शब्दांत सांगत होते. या मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकासाठी पुढाकार घ्यावा, असेही खडसे यांनी सुचविले असल्याने परळी येथील मेळाव्यात या मागणीसाठी किती जोर लावला जातो, यावर अवस्थेचे मोजमाप केले जाईल, अशी चर्चा राजकीय वतुर्ळामध्ये आहे.

‘माधव’ सूत्राचे प्रणेते

भाजपचे नेते वसंतराव भागवत यांनी भाजपाची मतपेढी घडविताना ‘माधव’चे सूत्र विकसित केले. पण त्याला खऱ्या अर्थाने अंमलबजवाणीमध्ये आणले ते गोपीनाथ मुंडे यांनी. त्यांच्याबरोबर या सूत्राला राजकीय बळ देण्यामध्ये ज्यांनी काम केले ते अण्णा डांगे सांगत होते,‘ १९८४-८५ मध्ये राज्यातून केवळ दोन खासदार आणि मुंबई महापालिकेत दोन नगरसेवक होते. तेव्हा दिल्लीत दोन आणि गल्लीत दोन असे डिवचले जायचे. तेव्हा धनगर समाजाची संघटना अधिक मजबूत केली.

सूर्यभान वहाडणे यांनी यास आक्षेप घेतला होता. त्यात मराठा समाजाला स्थान मिळायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे ‘माधव’ऐवजी ‘माधवंम’ असा त्यात बदल केला. आता धनगर समाजाचे नेतृत्व करणारे अनेक नेते असले तरी त्यांनी स्वत:च आरक्षणाची मागणी बाजूला फेकली आहे. गोपीनाथ मुंडे कुटुंबातील फाटाफुटीचे परिणाम केवळ राजकीय न राहता या समाजातही तशी फाटाफूट पाहावयास मिळते आहे. माळी समाजाचे काम तसे पुढे गेले नाही. ही जबाबादारी तेव्हा ना. स. फरांदे यांच्याकडे होती. आता नव्या घडामोडीत पक्ष बदलण्याचा विचार काही नेते मंडळी करत असतील ते चुकीचे ठरेल. कारण जे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जातील त्यांच्यासाठी काही पालखी तयार असणार नाही.’ स्थानिक पातळीवर मात्र अनेकांना असे वाटत नाही. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राख म्हणाले, ‘अनेक मतदारसंघात ‘माधवंम’मधील ‘व’ प्रभाव असला तरी त्या प्रमाणात तिकीटवाटप करताना न्याय मिळाला नाही. परळीसह एक-दोन जागा वगळता कोठेही या समाजाला वाव देतो आहोत, असा संदेश भाजप नेतृत्वाने दिला नाही. एका अर्थाने भाजप नेतृत्वाने अन्याय केला असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याची खळबळ दिसून येत आहे.’

गेल्या काही वर्षांत एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसत असले तरी जेवढा तो झाला त्या पेक्षा  खडसे त्याचा अलीकडे अधिक बाऊ करीत आहेत, असेही अण्णा डांगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते आहे. मात्र, नव्याने भाजपला बळकटी देणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अलीकडेच बोलताना म्हणाले की, ‘आमच्यावरही भाजपने अन्याय केला असला तरी त्यांची ताकद कमी झाली म्हणून लगेच त्यांना सोडून जाण्याची आपली वृत्ती नाही.’

स्वाभिमान मेळाव्यातून पुन्हा एकदा ‘माधवंम’चे शक्तिप्रदर्शन होणार आहे. ती शक्ती भाजपबरोबर किती काळ राहते, असे प्रश्न निर्माण होतील, असे संदेश दिले गेल्याने ‘राजी-नाराजी’ची विस्तृत भूमिका कशी मांडली जाईल, हे पाहणे अधिक औत्सुक्याचे असणार आहे.

दुपारनंतर परळीत कार्यक्रमाच्या फलकांवर कमळ

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथगडावरील ‘स्वाभिमान दिवस’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या फलकावर पंकजा व प्रीतम मुंडे यांचेच छायाचित्र झळकले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कमळ ही गायब झाल्याने दिवसभर माध्यमातून चर्चा रंगली. दरम्यान, दुपारी नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवर फक्त ‘कमळ’ फुलले. बीड जिल्ह्यातील परळी येथे गोपीनाथगडावर गुरुवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमान दिवस कार्यक्रम होत आहे. परळी मतदार संघातील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमातून प्रसारित केलेल्या मजकुरात पुढे काय करायचे, कोणत्या मार्गाने जायचे, आणि मावळ्यांनो या असे आवाहन केल्याने पंकजा पक्षात नाराज असून त्या वेगळा निर्णय घेण्याच्या चच्रेने गोंधळ उडाला आहे. पक्षाच्या मराठवाडा आढावा बठकीलाही पंकजा यांनी दांडी मारली. प्रसारमाध्यमांना एक दिवस वाट बघा, असे सांगत भूमिकेबाबतची संदिग्धता वाढवली आहे. पंकजा यांनी रात्री समाज माध्यमातून पुन्हा एकदा ‘स्वाभिमान दिवसाला तुम्ही या. मी वाट पाहते’ अशी पोस्ट टाकून समर्थकांना मोठय़ा संख्येने येण्याची साद घातली आहे. विधानसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच गोपीनाथगडावरील कार्यक्रमात पंकजा बोलणार असल्याने राज्यभरातील मुंडे समर्थक नेते व कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. या कार्यक्रमात पंकजा काय बोलतात, याबरोबरच किती नेते आणि लोक जमतात, यावरही पंकजा यांची पक्षांतर्गत वाटचाल आणि प्रभाव स्पष्ट होणार आहे.