भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराबाबतचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही मंगळवारी दोन दिवसांपासून ठेवलेले मौन सोडत पक्षांतराच्या वृत्तामुळे आपण व्यथित असल्याचे सांगितले. तसेच “मी पक्ष सोडणार नाही. बंडखोरी माझ्या रक्तात नाही,” अशी प्रतिक्रियाही पंकजा यांनी दिली आहे. असं असलं तरी पंकजा या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. तर दुसरीकडे पंकजा स्वत:च्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनतेला याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘पंकजा मुंडे भाजपा सोडतील असं वाटतं का?,’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीमध्ये सहा हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यात फेसबुकवरील साडेसहा हजारहून अधिक वाचकांपैकी ५५ टक्के वाचकांनी पंकजा मुंडे भाजपाला ‘जय महाराष्ट्र’ करत पक्ष सोडतील असे मत व्यक्त केलं आहे.

फेसबुकवरील जनतम चाचणीमध्ये सहा हजार ६०० वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ५५ टक्के म्हणजेच तीन हजार ६०० वाचकांनी होय पंकजा भाजपा सोडतील असं मत व्यक्त केलं. तर दोन हजार ९०० जणांनी नाही पंकजा भाजपामध्ये राहूनच काम करतील असं मत व्यक्त केलं. पंकजा भाजपात राहण्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या वाचकांची संख्या ४५ टक्के इतकी आहे.

काय आहे प्रकरण

माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. त्यात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली होती. त्यातून पंकजा मुंडे या नाराज असून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चेलाही हवा मिळू लागली. त्यामुळे पंकजा यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेनंतर भाजप नेत्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन पक्षांतराचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले, तर पंकजा यांनीही आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्याला पदापासून वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक अशी चर्चा केली जात असल्याचा खुलासा देताना आपण पक्षांतराच्या चर्चेने व्यथित झालो असल्याचे सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना रसद पुरवली असून माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच मिळू दिली नसल्याचा आरोप उघडपणे केला जातो. या पाश्र्वभूमीवर १२ डिसेंबर रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाला भाजप अंतर्गत नाराज नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.