राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर कथित चिक्की घोटाळ्यावरून निशाणा साधताना विरोधकांनी सोमवारी ‘जॉनी जॉनी, येस पापा, इटिंग चिक्की, यस पापा’ असे गाणे म्हटले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. वर्षभरापूर्वीच मी माझ्या वडिलांना गमावले आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करताना ‘पापा’ हा उल्लेख टाळला असता, तर मला बरे वाटले असते. ‘पापा’ या शब्दाऐवजी दुसऱय़ा कोणत्या शब्दाचा उल्लेख केला असता, तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना दिली. विरोधकांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही. ती त्यांची पद्धत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे आणि पुरावेही आहेत, असेही त्या म्हणाल्या.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकऱयांची कर्जमाफी, चिक्की घोटाळा, विनोद तावडे यांची पदवी या विषयांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. विधान भवनाच्या पायऱयांवर बसून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.