जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि एखाद्या ग्रुपचे अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. परभणी पोलिसांनी व्हॉट्सअॅप संदर्भात एक महत्वाचं पत्रक जारी केलं असून यामध्ये आपल्या परिसरातील ग्रुप अॅडमिनचा शोध घेण्यास सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्यांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात बोलावून काही गोष्टींची समज देण्यास सांगण्यात आलं आहे. अनेकदा व्हॉट्सअॅपवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात असतात. याचा सर्व त्रास पोलिसांना होत असतो. यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांना हे पत्रक पाठवलं आहे.

पत्रकात लिहिल्यानुसार, ‘आपणास आदेशीस करण्यात येते की, आपले पोलीस स्टेशन हद्दीतील जे ग्रुप कार्यरत आहेत त्यांचे अॅडमिन शोधून त्यांना समक्ष बोलावून कुठल्याही व्यक्ती, धर्माची, पुतळा, तैलचित्र मंदिर, मस्जिद, समाज मंदिर, चर्च, दर्गा, मदरसा इत्यादीबाबत आक्षेपार्ह मजकूर तसंच विटंबना, मानहानी करणारे, भावना भडकावणारे आणि सामाजिक तेढ, देशद्रोह इत्यादीबाबत लिखीत किंवा फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंगचा प्रसार करु नये. असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीशी देणे आणि पुर्तता अहवाल सादर करणे’.

यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला आपल्या ग्रुपवर कोण काय पोस्ट करत आहे यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. सामाजिक तणाव निर्माण करणारे तसंच आक्षेपार्ह मेसेज शेअर झाले तर ती जबाबदारी अॅडमिनची असणार आहे. जर ग्रुपमध्ये असं काही शेअर झालं तर ही सर्वस्वी अॅडमिनची जबाबदारी असणार असून पोलीस कारवाई करु शकतात.