परभणी : काही अटी कायम ठेवून निर्बंध खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर आज सर्वत्र रस्त्यावर तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. शहरातल्या मुख्य चौकांमध्ये तुडुंब गर्दीने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार पहायला मिळाले. वेगवेगळ्या दुकानावर ग्राहकांची झुंबड तर मुख्य बाजारपेठेत अक्षरश: जत्रा भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल दोन महिन्यांच्या अंतराने आज सोमवारी (दि.७) निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शहरातील बाजारपेठा पूर्ववत गजबजल्या.

शहरातील गांधी पार्क, नारायण चाळ, अष्टभुजा देवी चौंक, शिवाजी चौंक, नानलपेठ कॉर्नर, कच्छी बाजार आदी ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये र्निजतुकीकरण, तापमापक व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी ग्राहकही रांगेत थांबून सुरक्षित अंतराचा निकष पाळत असल्याचे दिसून आले.  दोन महिन्यांपासून खरेदी करता न आल्याने सकाळपासूनच नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये धाव घेतली.

कपडे, पादत्राणे, कटलरी, बल्ब—टय़ुबसारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंची खरेदी, इस्त्री—गिझर—मिक्सरसारख्या उपकरणांची दुरुस्ती त्याचबरोबर मोबाइल फोनसह, कॉम्प्युटर, लॅपटॉपची खरेदी—दुरुस्तीसाठी येणा?ऱ्या ग्राहकांची संख्या मोठी होती.  यंदा पावसाला लवकर प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी धावपळ सुरू केली असून कृषीविषयक साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शहरात आलेल्यांचे प्रमाणही आज लक्षणीय होते. एरवी कृषीविषयक साहित्याच्या खरेदीसाठी र्निबधाच्या काळातही सवलत देण्यात आली होती मात्र आज मोंढा परिसर आणि कृषी साहित्याच्या दुकानावर प्रचंड गर्दी दिसून आली. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर एकाच वेळी बाजारात तुडुंब गर्दी झाल्याने अशीच परिस्थिती दररोज निर्माण होणार का अशी धास्तीही व्यक्त होत आहे.