जनतेने विश्वासाने आपणाला निवडून दिले असून नगरसेवकांनी जबाबदारीनेच वागले पाहिजे मतभेद असतील तर ते सार्वजनिक न करता पक्षीय पातळीवरच चर्चा करून मिटविले पाहिजेत, यासाठी गटनेत्यांनी सर्वसाधारण सभेपूर्वी बठक घेऊन वादग्रस्त विषयावर चर्चा घडवून आणावी, असा सल्ला पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी सांगली महापालिकेत पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत दिला.
महापालिकेच्या ड्रेनेज योजनेवरून सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत दुफळी निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर डॉ. कदम यांनी पदाधिका-यांची बठक सोमवारी महापालिकेत बोलावली होती. महापालिकेच्या प्रलंबित विकासकामांबाबत या वेळी चर्चा झाली. ड्रेनेज योजनेची फेरनिविदा काढण्याचा आदेश महापौरांनी गत सप्ताहात झालेल्या महासभेत दिला होता. या आदेशाला काँग्रेसच्याच काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवत पदाधिका-यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली होती.
महापालिकेतील विकासकामे निधीअभावी रखडली असल्याचे पदाधिका-यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पाणीपुरवठा, शेरीनाला, शिक्षण मंडळाकडील शिक्षकांचे वेतन याबाबत अधिका-यांनी सद्य:स्थिती कथन केली. राज्य शासन स्तरावर असणारे प्रलंबित निर्णय आणि केंद्र स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव तात्काळ घेऊन मुंबईस पदाधिका-यांनी यावे, यासंदर्भात असणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. फेब्रुवारीअखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने हे प्रस्ताव तातडीने आणावेत असेही त्यांनी सांगितले. या बठकीस महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती राजेश नाईक, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सुरेश आवटी, हारून शिकलगार, माजी महापौर मनुद्दीन बागवान आदी उपस्थित होते.