भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविरुद्ध चांगले वातावरण असून अरविंद केजरीवाल यांची आम आदमी विकास पार्टीस लोकमत चांगले असून जास्तीत जास्त जागा निवडून येणार आहेत. जे भ्रष्ट आहेत त्यांच्या पाठीशी लोकांनी राहू नये. महाराष्ट्रातसुद्धा भ्रष्टाचारविरोधी वातावरण असून याचा फटका निश्चितच सत्ताधारी पक्षांना बसणार आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाईट स्थिती असून भ्रष्टाचाराची सर्वात जास्त लागण येथील लोकांना झाली आहे. त्याचे आगामी काळात निश्चितच पडसाद उमटणार असून त्याची किंमत मोजावी लागेल, असा गर्भित इशारा शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत खारदोडफुले येथे नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, विहुर धरणातील पाणी सुकले तेव्हा आमदार मीनाक्षी पाटील यांनी तीन कोटी रुपये शासनाकडून आणून येथील गावांचा पाणी प्रश्न सोडवला आहे. शेतकरी कामगार पक्ष जे काम हातात घेते ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. किमान २५ टक्के रक्कम तरी स्वच्छतेवर खर्च झाली पाहिजे. ग्रामपंचायतींनी स्वच्छतेवर अधिक भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मीनाक्षी पाटील यांनी मुरुड तालुक्यात सर्वाधिक विकासकामे केली आहेत, परंतु विरोधी ही विकासकामे थोपवू पाहात आहे. डोंगरी येथील सनसेट पॉइंटसाठी १ कोटी ७५ लाख रुपये आणले, परंतु काही विघ्नसंतोषी मंडळींनी वनखात्याचा अडसर आणला आहे. शेकाप पोकळ आश्वासन देत नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधून काम करून दाखवतो. आगामी येणाऱ्या निवडणुकीत शेकापचा भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा असेल. प्रसारमाध्यमांनी भ्रष्टाचारात अडकलेल्या लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नये. भ्रष्टाचारविरोधी मोहीम प्रसारमाध्यमांनी राबवावी, अशी अपेक्षा या वेळी त्यांनी व्यक्त केली. मला नारळ फोडायला आवडत नाही, तर प्रथम काम पूर्ण करतो. मगच उद्घाटनाला प्राधान्य देतो. लोकांनी भ्रष्टाचारी लोकांना मते देऊ नये तरच असे लोक निवडून येणार नाहीत. मुरुड तालुक्याच्या इतर विकासकामांना चालना देण्यासाठी विकास आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.