प्रशासकीय यंत्रणेत दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने लोकांना कायद्याचा धाक वाटत नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा फायदा नागरिकांना सहज मिळावा यासाठी सर्व योजना ऑनलाइन सुरू केल्यास जनतेचे प्रश्न तातडीने सुटतील, असा विश्वास राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
   जिल्हा सेतू समिती अंतर्गत शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बु. ( ता.संगमनेर ) येथे सेतू उपकेंद्राच्या उदघाटनप्रसंगी  विखे बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, अण्णासाहेब भोसले, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, विनायक बालोटे, माधवराव गायकवाड, प्रभाकर निघुते, जि.पच्या सदस्य कांचनताई माढरे, भगवान इलग ,कैलास तांबे, सरपंच जयश्री ताजणे, उपसरपंच भारत ज-हाड आदी उपस्थित होते.
      एकच सेतू केंद्र असल्याने नागरिकांची अडचण होत असे सेतू केंद्राचे विकेंद्रीकरण झाल्याने त्यांची संख्या वाढल्याने त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे, असे सांगून विखे म्हणाले, नागरिकांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषिमाल बाजार भावांचे डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील नागरिक व शेतकरी यांना तालुका, जिल्हा व राज्यातील बाजार समित्यांच्या कृषिमालाच्या बाजारभावाची माहिती दररोज मिळणार आहे. कृषी खात्यातील विविध योजना, खते व बियाणे यांची माहिती ऑनलाइन केल्याने गैरव्यवहारास मोठय़ा प्रमाणात आळा बसल्याचे त्यांनी सांगितले, लवकरच आश्वी परिसरातील २६ गावांसाठी स्वतंत्र कृषिमंडल कार्यालय आश्वी खुर्द येथे सुरू करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
    प्रांताधिकारी संदीप निचित यांनी सेतू केंद्राची भूमिका विशद केली. सेतू केंद्राकडून १८ प्रकारचे विविध दाखले दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ इलग यांनी केले.