News Flash

मोदींच्या साक्षीनेच लोक शंभर रुपये लिटरने पेट्रोल भरताहेत -अजित पवार

"जाऊ द्या आता, त्याला काय करणार?"

अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशीसंवाद साधला.

देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाला चिमटा काढला. पुण्यात करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यासह राज्यातील लसीकरण, जागतिक निविदा, भारत बायोटेकला जागा देणे, जयंत पाटील यांची नाराजी तसेच मराठा आरक्षण यांसह विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देत असतानाच अजित पवार यांना लसींच्या प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.

पुण्यातील करोना परिस्थितीसंदर्भात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,”भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात २० एकर जमीन मागितली आहे. त्यांना लसीच्या उत्पादनासाठी ही जमीन हवी असून, त्यांना जमीन देण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या आहेत. त्यांच्या लसीचे उत्पादन सुरू व्हायला ३ महिने लागतील. परंतु त्याधी त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध होतील. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तिथं भेट दिली. तिथं लाईट, पाणी वगैरे सुविधा तत्काळ दिल्या जात आहे. ही लस नियमानुसार सर्वत्र पुरवली जाईल. पण पुण्याला ही लस मिळावी यासाठी मी अधिकार्‍यांना प्रयत्न करायला सांगितले आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. पण त्याचबरोबर ऑक्सिजन किती आला आणि कुठल्या राज्याला किती देण्यात आला हे पारदर्शकपणे केंद्र सरकारने सांगायला हवे. ग्लोबल टेंडर काढण्यासाठी पालिकेला राज्य सरकार परवानगीची गरज नसते. पालिकेने स्वत टेंडर काढायचे असतात. मुंबई महापालिकेनेही ग्लोबल टेंडर काढले आहे. पुणे पालिकेचे गटनेते चुकीची माहिती देत आहेत. म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणारी औषध मिळावीत यासाठी सोमवारी मुंबईत बैठक घेणार आहे,” अशी माहितीही पवार यांनी दिली.

जाऊ द्या आता, त्याला काय करणार?

करोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून, त्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. लोकं त्याबद्दल नाराजीही व्यक्त करत असल्याचं म्हटल्यानंतर अजित पवारांनी याला उत्तर दिलं. “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता करता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, शंभर रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय,” असं पवार म्हणाले. तुमच्यासाठी पण त्यांचा फोटो असेल का? असं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले,’मी काय वेगळा लागून गेलोय का? तुमच्या माझ्यासहीत सर्वच नागरिकांच्या प्रमाणपत्रावर असणार. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत म्हणून त्यांनी ते आणलंय. त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो.. तसलं काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे,” अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 3:15 pm

Web Title: petrol diesel price hike update ajit pawar narendra modi modi government bmh 90 svk 88
Next Stories
1 संतापजनक… दुसरं लग्न करणाऱ्या महिलेला जात पंचायतीने दिली विकृत शिक्षा
2 गाथा महाराष्ट्राची! मराठी काव्य परंपरेवर ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांचे व्याख्यान!
3 “केंद्रानं पुरवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा, तंत्रज्ञांनाही दुरुस्त करता येईनात!”, सचिन सावंत यांचा आरोप!
Just Now!
X