पोलीस-गुन्हेगारांत भरदुपारी चकमक
पोलीस कर्मचारी दीपक कोलते हत्या प्रकरणासह तीन जिल्ह्य़ांतील विविध गुन्ह्य़ांमधील आरोपी सुरेश ऊर्फ पिन्या कापसे गुरुवारी गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात साथीदारासह आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. मात्र, पोलीस दिसताच पिन्या कापसेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बीड जिल्ह्य़ातील चकलांबा (गेवराई) हद्दीतील श्रृंगारवाडी फाटय़ावर गुरुवारी दुपारी पोलीस आणि सराईत गुन्हेगारांत चकमक झाली. शेवगाव (जिल्हा-नगर) पोलीस ठाण्यातील कर्मचारी दीपक कोलते यांच्या खूनप्रकरणातील आरोपी सुरेश ऊर्फ पिन्या कापसे हा अहमदनगर, बीड व औरंगाबाद या तीन जिल्ह्य़ांतील पोलिसांना गुंगारा देत होता. विविध पोलिस ठाण्यांत पिन्या कापसेविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
पिन्या कापसे व बप्पा विघ्ने हे दोघे गुरुवारी सकाळी चकलांबा परिसरात आल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुपारी दोनच्या सुमारास श्रृंगारवाडी फाटय़ावर आरोपी असलेल्या ठिकाणी सापळा लावला असता पिन्या कापसेने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पिन्या कापसे व बप्पा विघ्ने दोघेही गंभीर जखमी झाले.