विजय राऊत, कासा

शासनाच्या आदेशानुसार जव्हार नगर परिषदेने प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करीत असल्याचा गाजावाजा केला खरा, मात्र बंदीनंतरही जव्हारमधील कचराभूमीवर पिशव्यांचा ढीग पसरला आहे. या जुना राजवाडा कचराभूमीवरील प्लास्टिकबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

जुना राजवाडा येथील कचराभूमीला लागून सनसेट पॉइंटला हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजच पर्यटक येत आहेत. तसेच या ठिकाणी उपवन संरक्षक यांचे निवासस्थान आणि सनसेट बार, लॉजिंग आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक निवासस्थान करीत आहेत. मात्र नगर परिषद कार्यालयाजवळ कचरा असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

जव्हार शहरातून नाशिक, ठाणे, पालघर आणि सिल्वासा या शहरांना हाच बाह्य़वळण रस्ता असल्याने येथून रोजच ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यावर कचरा असल्याने सर्वानाच त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. तर हे डम्पिंग ग्राऊंड हटवून दुसरीकडे स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे.प्लास्टिकबंदी असतानाही या कचराभूमीवर सर्वाधिक कचरा हा प्लास्टिक पिशव्यांचा आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदी असतानाही जव्हार शहरातून एवढय़ा प्लास्टिक पिशव्यांचा कचरा जमा होतो कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या डम्पिंग ग्राऊंडवर डुकरं, गाई, गुरांची वर्दळ असल्याने चिखल होऊन हा चिखल रस्त्यापर्यंत पसरतो. त्यामुळे दुर्गंधीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड हटवावे आणि प्लास्टिकबंदी जव्हारमध्ये झाले नसल्याचे चित्र आहे.

प्रशासनाने प्लास्टिक बंदीबाबत गंभीर दखल घेतली असून कचराभूमीवर यापुढे प्लास्टिक टाकले जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसे करताना कोणी आढळल्यास दंड केला जाईल.

– प्रसाद बोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जव्हार नगर परिषद