तौते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तसेच, गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा!

“CycloneTauktae मुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरात चा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत? ” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केला आहे.

दरम्यान, देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

Cyclone Tauktae : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाही मदत मिळणार; मात्र यावर जाणीवपूर्वक राजकारण सुरू!

तर, “तौते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे.” असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाड येथे माध्यमांशी बोलताना महाविकासआघाडी सरकारवर केला आहे.