पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसंच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील याविषयीही चर्चा केली. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३२ झाली आहे. शनिवारच्या एका दिवसात महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १२ रुग्णांनी वाढली होती. तर आज औरंगाबादमध्ये एका महिलेला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच मॉल्स, नाट्यगृहं, जिम्स, स्विमिंग पूलही बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सध्या ३१ मार्च पर्यंत हे आदेश आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. अनेक देवस्थानांमध्येही भाविकांनी जाताना गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत. मात्र गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. देशात करोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर कऱण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत काय उपाय योजता येतील याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे.